अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी सी : फसवणूक आणि ओळखचोरीच्या (आयडेंटिटी थेफ्ट) गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगत असलेले रिपब्लिकन पक्षाचे माजी खासदार जॉर्ज सँटोस यांची शिक्षा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमी करून त्यांची तुरुंगातून तत्काळ सुटका केली आहे. ट्रम्प यांनी आपला हा निर्णय समाज माध्यमांवर पोस्टद्वारे जाहीर केला.
जॉर्ज सँटोस यांच्यावर फारच अन्याय झाला आहे. त्यामुळे मी त्यांची शिक्षा कमी करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून ते तत्काळ मुक्त होत आहेत. ‘शुभेच्छा जॉर्ज - तुमचे पुढचे आयुष्य छान जावो!’ असे त्यांनी त्यात म्हटले आहे. सँटोस यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या 2023 मधील चौकशी अहवालातील कडक टीकेनंतर त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. अशा प्रकरणात हकालपट्टी झालेले ते अमेरिकेच्या इतिहासातील सहावे खासदार ठरले.
अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सँटोस यांनी स्वतःच्या नातेवाईकांसह 11 व्यक्तींच्या ओळख चोरल्याची कबुली दिली होती. शुक्रवारी रात्री त्यांची सुटका करण्यात आली. आपल्या सात वर्षांच्या शिक्षेपैकी त्यांनी केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी काळ तुरुंवास भोगला. नव्याने राजकारणात आलेल्या या नेत्याने खोटे सांगून मतदारांची फसवणूक केली आणि प्रचारनिधीचा वैयक्तिक लाभासाठी उपयोग केला, असा दावा फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी केला.
ट्रम्प यांना भावनिक आवाहन
या आठवड्याच्या सुरुवातीला सँटोस यांनी साउथ शोर प्रेस या लाँग आयलंडमधील वृत्तपत्रात ‘ट्रम्प यांना भावनिक विनंती’ या शीर्षकाचे खुले पत्र प्रसिद्ध केले. मला माझ्या कुटुंबाकडे आणि समाजाकडे परतण्याची संधी द्या, अशी विनंती त्यात त्यांनी केली होती. मी सहानुभूती नव्हे, तर न्याय मागतो आहे. मी माझ्या चुका मान्य केल्या आहेत आणि जबाबदारी स्वीकारली आहे, असेही त्यांनी त्यात म्हटले होते.
ट्रम्प यांनी जानेवारीत पुन्हा राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दोन इतर रिपब्लिकन नेत्यांना माफी दिली आहे. मे महिन्यात माजी खासदार मायकल ग्रिम (करचुकवेगिरी प्रकरण) यांना त्यांनी माफी दिली. कनेक्टिकट जे माजी गव्हर्नर जॉन रोवलँड (भ्रष्टाचार प्रकरण) हेही ट्रम्प यांच्या मुळे माफीला पात्र ठरले.
23 फेडरल गुन्हे
सँटोस यांचा खोटेपणा 2022 मध्ये ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने उघड केला. त्यांच्या बनावट शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचा पर्दाफाश त्यांच्या वार्तापत्रामुळे केला गेला. त्यांनी सिटी ग्रुप आणि गोल्डमन सॅक्स येथे काम केल्याचा आणि विद्यापीठाची पदवी घेतल्याचा खोटा दावा केला होता. मृतप्राय कुत्र्याच्या उपचारासाठी निधी गोळा करून तो स्वतःसाठी वापरणे, आईचा 9/11 दहशतवादी हल्ल्यात बचाव झाल्याचा खोटा दावा करणे, असे आरोप त्यांच्यावर होते.