Mexico Fire Explosion : मेक्सिकोच्या हर्मोसिलो येथील वाल्डो स्टोअरमध्ये झालेल्या भीषण आगीत सुमारे २३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. या अपघातात अकरा जण जखमी झाल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. सोनोराचे गव्हर्नर अल्फोन्सो दुराझो यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये या घटनेची पुष्टी केली.
या दुर्घटनेबाबत राज्याचे ॲटर्नी जनरल गुस्तावो सालास चावेझ यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात विषारी वायू श्वासोच्छ्वासामुळे मृत्यू झाल्याचे दिसून येते. आग जाणूनबुजून लावण्यात आली असल्याचा कोणताही संकेत सध्या मिळालेला नाही. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, "या भयानक अपघातात प्रियजन गमावलेल्या सर्व कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. सरकारी मदतपथके घटनास्थळी पोहोचली आहेत."
सोनोराचे राज्यपाल अल्फोन्सो दुराझो यांनी व्हिडिओ संदेशात सांगितले की, मृतांपैकी अनेक अल्पवयीन आहेत. स्फोटाच्या पारदर्शक चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षा आणि आरोग्य सेवांनी तात्काळ उपाययोजना राबवून अनेकांचे जीव वाचवले. दरम्यान, मेक्सिकोतील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सुपरमार्केटमध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरमुळे ही दुर्घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात असल्याचे दिसून येते आणि तपास सुरू आहे.