इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गुरुवारी उशिरा दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले. (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

'इस्रायल'चा 'हिजबुल्लाह'वर हल्ला, १ हजार रॉकेट लाँचर बॅरल्स नष्ट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

मध्य पूर्वेत संघर्ष वाढला आहे. इस्रायलच्या (Israel) लढाऊ विमानांनी गुरुवारी रात्री उशिरा दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या (Hezbollah) ठिकाणांवर जोरदार हल्ले केले. (Israel vs Hezbollah) इस्रायलने हिजबुल्लाहच्या शेकडो रॉकेट लाँचर बॅरल्सला लक्ष्य केले. ज्याचा वापर इस्रायलवर तात्काळ गोळीबार करण्यासाठी केला जाणार होता, असे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सुमारे १ हजार बॅरल्स असलेले जवळपास १०० रॉकेट लाँचर उद्ध्वस्त केले. "इस्त्रायली संरक्षण दलाची (Israel Defense Forces) हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेच्या विरोधात कारवाई सुरुच राहील," असा इशारा इस्रायली संरक्षण दलाने दिला आहे.

लेबनॉनमधील पेजर स्फोटातील मृतांची संख्‍या ३७ झाली आहे. तर सुमारे ३ हजार लोक जखमी झाले आहेत. इराण समर्थक हिजबुल्लाहच्या सदस्यांनी वापरलेल्या वॉकी-टॉकी, सौर उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा बुधवारी एकाचवेळी स्फोट झाला होता. या स्फोटांसाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले आहे.

दक्षिण लेबनॉनवर डझनभर बॉम्ब हल्ले

गुरुवारी रात्री उशीरा केलेल्या कारवाईत इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर डझनभर बॉम्ब हल्ले केले, अशी माहिती लेबनीज सुरक्षा सूत्रांनी दिली. यात हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सांगितले की, इस्रायलची हिजबुल्लाविरुद्ध लष्करी कारवाई सुरुच राहील.

इस्रायल- हिजबुल्लाह युद्ध थांबवण्याचे आवाहन

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध तात्काळ थांबावे, असे आवाहन केले आहे. या दोघांमध्ये संघर्ष आणखी वाढणार असल्याची भीतीही अमेरिकेने व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT