स्टॉकहोम : पुढारी ऑनलाईन
भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी त्यांची पत्नी एस्तेर दुफालो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. स्विडनची राजधानी स्टॉकहोम येथे या पुरस्काराची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. अभिजीत बॅनर्जी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
'जागतिक गरीबी निर्मुलन संशोधन' यासाठी केलेल्या शाश्वत कामाबद्दल या तिन्ही अर्थशास्त्रज्ञांना गौरविण्यात आले आहे. इकॉनॉमिक सायन्स प्रकारांतर्गत हा पुरस्कार मिळालेले अभिजीत बॅनर्जी हे भारतीय वंशाचे पण अमेरिकन नागरिक आहेत. अभिजीत हे सध्या मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते अब्दुल लतीफ जमील गरीबी पॉव्हर्टी ॲक्शन लॅबचे सह-संस्थापक आहेत.
अभिजीत बॅनर्जी हे एक भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९६१ रोजी कोलकाता येथे झाला होता. त्यांनी कोलकाता विद्यापीठ आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अभिजीत यांनी १९८८ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे.
२००३ मध्ये अभिजीत बॅनर्जी यांनी 'अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी ॲक्शन लॅब'ची स्थापना केली. या कामात त्यांना एस्तेर डुफलो आणि सेंदिल मुल्लाइनाथन यांचे सहकार्य मिळाले.
बॅनर्जी हे अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस आणि द इकॉनॉमिक सोसायटीचे सहयोगी संशोधक राहिले आहेत. आर्थिक विकास विश्लेषणासाठी ब्यूरोचे माजी अध्यक्ष होते. त्यांना इन्फोसिस पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.