पुढारी ऑनलाईन डेस्क: Boeing China | अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ युद्धादरम्यान चीनने आता मोठा निर्णय घेतला आहे. चीनने मंगळवारी (दि.१५) आपल्या विमान कंपन्यांना बोईंग कंपनीकडून कोणत्याही नव्या विमानांची मागणी किंवा डिलिव्हरी न करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व चिनी उत्पादनांवर १४५% जास्त दराचा आयात शुल्क लावल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध अधिक तीव्र झाले आहे. दरम्यान बीजिंगने अमेरिकन कंपन्यांकडून विमानसंबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या खरेदीला तातडीने थांबवण्याचे आदेश दिल्याचे ‘ब्लूमबर्ग’ने वृत्त दिले आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, वाढत्या आयात शुल्कामुळे होणाऱ्या खर्चाच्या भारातून दिलासा मिळावा म्हणून चिनी सरकार बोईंग विमान भाड्याने घेणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर, बोईंगचे सुटे भाग आणि विमाने चीनसाठी जवळपास दुपटीने महाग पडणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षात अमेरिकन विमाननिर्माता कंपनी बोईंग अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. या संघर्षात मुळीच शिथिलता दिसत नसल्यामुळे बोईंगचा सर्वात मोठा बाजार असलेल्या चीनवर याचा परिणाम झाला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पुढील २० वर्षांत जागतिक विमान बाजारातील सुमारे २० टक्के मागणी चीनकडून येणार आहे. इतकंच नव्हे, तर २०१८ मध्ये बोईंगच्या एकूण विमान विक्रीपैकी जवळपास २५ टक्के हिस्सा चीनचा होता. ही घडामोड त्या घटनेनंतर दोन दिवसांनी घडली आहे, ज्या वेळी चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिका सरकारकडे चिनी आयातींवरील १४५% आयात शुल्क "पूर्णतः रद्द" करण्याची मागणी केली होती.