सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या समुद्र किनाऱ्यासमोर शुक्रवारी उशिरा एक विध्वंसक दहशतवादी हल्ला झाला. (Image Source- X)
आंतरराष्ट्रीय

मोगादिशूच्या बीचवर नरसंहार! दहशतवादी हल्ल्यात ३२ ठार, ६३ जखमी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या समुद्र किनाऱ्यासमोर (Somalia beach terror attack) शुक्रवारी उशिरा एक विध्वंसक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात किमान ३२ लोकांचा मृत्यू झाला असून ६३ जण जखमी झाले आहेत. अल-कायदा (Al-Qaeda) संघटनेशी संबंधित जिहादी गट अल-शबाबने (Al-Shabaab) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याची सुरुवात एका आत्मघाती बॉम्बरने प्रसिद्ध लिडो बीचवर (Lido Beach) त्याच्या उपकरणाचा स्फोट करून केली.

"या रेस्टॉरंट हल्ल्यात सुमारे ३२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे," अशी माहिती पोलिस प्रवक्ते अब्दिफाताह एडन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेतील हल्लेखोराने आत्मघाती हल्ल्यात स्वत:ला उडवून घेत इतर तिघांना ठार केले. दरम्यान, एका हल्लेखोराला पकडण्यात आले असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

पाचही बंदूकधारी हल्लेखोरांना केले ठार

या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर सुरक्षा दलांनी पाचही बंदूकधारी हल्लेखोरांनी ठार केले. या हल्लेखोरांचा "खारिजीट्स" असा उल्लेख केला जातो. अधिकारी अल-शबाबच्या सदस्यांचे वर्णन करण्यासाठी या शब्दाचा उल्लेख करतात. या गटाच्या सहाव्या सदस्याने समुद्रकिनारी स्वत: ला उडवून घेतले." अशी पुष्टी करण्यात आली आहे.

मोगादिशू समुद्रकिनारी स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार

मोठ्या गर्दीच्या ठिकाणी हा आत्मघातकी स्फोट झाला. हे दृश्य भयानक होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. "प्रत्येकजण घाबरला होता आणि नेमके काय घडत आहे हे कळत नव्हते. कारण स्फोटानंतर लगेचच अंधाधुंद गोळीबार सुरू झाला," असे हल्ल्याच्यावेळी उपस्थित असलेले अब्दिलातीफ अली म्हणाले.

क्षणात रक्ताचा सडा पडला

जवळच्या हॉटेलमधून ही घटना पाहिलेल्या अहमद यारे यांनी ही घटना धक्कादायक असल्याचे नमूद केले. "मी समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला जखमी लोकांना पाहिले. लोक घाबरून ओरडत होते आणि कोण मरण पावले आणि कोण जिवंत आहे हे कळणे कठीण झाले होते," असे ते म्हणाले.

सरकारची दहशतवाद्यांविरुद्ध तीव्र कारवाई

हा हल्ला अल-शबाबने मोगादिशू आणि संपूर्ण सोमालियामध्ये घडवून आणलेल्या हिंसक कृत्यांच्या मालिकेतील ताजी घटना आहे. कारण सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. गेल्या महिन्यात मोगादिशूत एका कॅफेमध्ये झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात पाच जण ठार झाले होते. मार्चमध्ये, दहशतवाद्यांनी मोगादिशू हॉटेलची तासभर घेराबंदी करत तीन जणांना ठार केले होते. तर २७ जण जखमी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT