हिजबुल्लाहचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण बेरूतमध्ये इस्रायलने हवाई हल्ला केला. (image source- X)
आंतरराष्ट्रीय

'इस्रायल'चा 'हिजबुल्लाह'वर एअर स्ट्राईक, टॉप कमांडरसह १४ ठार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

हिजबुल्लाहचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण बेरूतमध्ये (Beirut) इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात (Israeli strike) हिजबुल्लाहच्या एका वरिष्ठ कमांडरसह (top hezbollah commander) सुमारे १४ लोक ठार झाले आहेत. (Israel vs Hezbollah) दोन्ही बाजूंकडून हल्ले सुरु असल्याने मध्य पूर्वेत युद्धाची भीती निर्माण झाली आहे. हिजबुल्लाहच्या एलिट राडवान फोर्सचा एक भाग असलेला वरिष्ठ हिजबुल्लाह कमांडर इब्राहिम अकील हा अन्य कमांडरसह मारला गेला आहे. उत्तर इस्रायलमधील गॅलीलीमधील समुदायांवर ताबा मिळवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे, असे इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) चे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे.

हिजबुल्लाहनेदेखील शुक्रवारी अकीलच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, "बेरूतच्या दक्षिणी उपनगरात २० सप्टेंबर रोजी इस्रायलने केलेल्या घातक हल्ल्यात तो मारला गेला." हिजबुल्लाहने जारी केलेल्या दुसऱ्या एका निवेदनात म्हटले आहे की, बेरूतचे दक्षिणेकडील उपनगर दहियेह येथे अकील मारला गेला. इस्रायलने केलेली ही धोकादायक हत्या आहे.

२०२४ च्या सुरुवातीपर्यंत गाझा युद्धादरम्यान राडवान स्पेशल फोर्सेसच्या लष्करी ऑपरेशन्सवर देखरेख ठेवणारा कमांडर अहमद वहबी देखील इस्रायली हल्ल्यात मारला गेला होता.

इस्रायलच्या हल्ल्यात १४ लोकांचा मृत्यू

रायटर्सच्या वृत्तानुसार, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यात किमान १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकांकडून रात्रभर काम सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यात अकील अथवा इतर कोणत्याही हिजबुल्लाहच्या कमांडरचा समावेश आहे की नाही याचा खुलासा मंत्रालयाने केलेला नाही. याआधी, मंत्रालयाने सांगितले होते की किमान ६६ लोक जखमी झाले आहेत. त्यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Israel vs Hezbollah : इमारतीवर झेपणास्त्रे धडकली

दुसऱ्या सुरक्षा सुत्रांनी सांगितले की, इमारतीच्या गॅरेजवर अनेक क्षेपणास्त्रे येऊन धडकली. यामुळे ६ हिजबुल्लाह कमांडरचा मृत्यू झाला. अकील इतर कमांडरना आतमध्ये भेटायला गेल्याच्या दरम्यान इमारतीच्या खालच्या बाजूला स्फोट झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT