डिचोली : मुसळधार पावसाने बुधवारी दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले. तिळारी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी दुपारी 2.50 मिनिटांनी तिळारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सांड कालव्यामधून तिळारी नदी पात्रात पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे तिळारी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तिळारी धरणाचे चारही दरवाजे वर उचलण्यात आले आहेत. धरण परिसरात झालेल्या पावसामुळे नियोजित पाणी पातळी 106.70 ही बुधवारी दुपारी 2.50 मि. पूर्ण होऊन अतिरिक्त पाणी कोनाळ पुच्छ कालवा खळग्यातील धरणातून तिळारी नदी पात्रात दाखल झाले. त्यामुळे तिळारी, कोनाळ, घोटगे, परमे, साटेली भेडशी, आवाडा, वायंगणतड, कुडासे, वानोशी, मणेरी, सासोली आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीतील पाणी अचानक वाढू शकते. त्यामुळे कपडे धुण्यासाठी किंवा गुरांना घेऊन नदी काठी जाऊ नये, नदी पात्रात असलेल्या कॉजवेवरून प्रवास करू नये, असे आवाहन जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी केले आहे.