म्हापसा : बागा व हडफडे येथे दोन खासगी आस्थापनांवरील एलईडी डिस्प्ले बोर्डवर पाकिस्तान झिंदाबाद असा नारा झळकू लागल्यामुळे दोन्ही ठिकणी मंगळवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी रणजीत भाटिया (रा. हरियाणा), विपिन पहुजा (रा.हरियाणा), विनय चंद्रा राव (कर्नाटक), कृष्णा लमाणी (कर्नाटक), मनोज कुमार (बिहार) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानांवर लावलेल्या एलईडी डिस्प्ले बोर्डद्वारे राष्ट्रविरोधी पाकिस्तान झिंदाबादचा नारा झळकावून स्थानिकांत भीती व द्वेष निर्माण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कलम 152/61(2) नुसार गुन्हा नोंद केला आहे. स्थानिकांनी संबंधित व्यावसायिकास याबाबत जाब विचारला व हडफड येथे तणाव निर्माण झाला होता. असाच प्रकार कळंगुट येथेही घडला होता.
हा प्रकार नजरेस येताच स्थानिकांनी सरपंच रोशन रेडकर यांच्या निदर्शनास ही बाब आणली. त्यानंतर सरपंच रोशन रेडकर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्यांनाही एलईडी डिस्प्ले बोर्डवर तो आक्षेपार्ह नारा दिसला. त्यानंतर त्यांनी दुकान चालकाला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर सरपंच रोशन रेडकर यांनी हणजूण पोलिसांना याबाबत कळवून तशी तक्रार दिली व कारवाईची मागणी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी पाच जणांवर कारवाई केली. याप्रकरणी निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर तपास करीत आहेत.
ही घटना सायबर हॅकिंगच्या प्रकारातून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सायबर क्राईम विभाग व पोलिस तपास करीत आहेत. सायबर क्राईमच्या माध्यमातून हा प्रकार कोणी केला त्याचा शोध घेतला जाईल, असे निरीक्षक सूरज गावस यांनी सांगितले. कोणीही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. राष्ट्र प्रथम या न्यायाने वागण्याची गरज आहे. हा प्रकार घडल्यामुळे संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे हडफडे सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितले.
धार्मिक तेढ निर्माण करू नका ः आमदार लोबो
राष्ट्रविरोधी नारा देण्याचे गोव्यात कोणीही धाडस करू शकणार नाही. दुकानावर लावलेला डिस्प्ले बोर्ड हॅक केल्यामुळे हा प्रकार घडला असावा. हॅकरचा शोध पोलिस घेत आहेत. गोव्यात सर्वधर्माचे लोक सामंजस्याने राहतात, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नही कोणी करू नये, असे आमदार तथा गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो यांनी म्हटले आहे.
डिजिटल बोर्ड बंद करा ः परब
कळंगुट पंचायत सदस्य व उत्तर गोवा महिला शक्ती अभियान अध्यक्ष गीता परब म्हणाल्या, हडफडे व कळंगुट येथील प्रकार अतिशय निंदनीय आहे. अशा प्रकारांमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा प्रकार इतर धर्मियांबाबत झाल्यास जातीय तेढ निर्माण होऊ शकते. या प्रकाराकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी व वीज खात्याने कारवाई करून अशा प्रकारचे डिजिटल बोर्ड बंद करण्याची मागणी परब यांनी केली.