पणजी : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चित असलेले मंत्रिमंडळातील फेरबदल कधी होणार? याबाबतचे सस्पेन्स कायम आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आणि केंद्रीय पातळीवर चर्चांच्या फेर्या रंगल्या आहेत. यासाठी गाठीभेटी आणि लॉबिंग मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात सभापती रमेश तवडकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो यांची नावे आघाडीवर आहेत.
कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने त्यांची एक जागा रिक्त आहे. याशिवाय अन्य काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांच्या जागी नव्या आमदारांना संधी देण्यात येणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या काही आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र मंत्रीपदासाठी सभापती रमेश तवडकर यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री कामत, माजी मंत्री लोबो, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो यांची नावे चर्चेत आहेत. याबद्दल केंद्रीय नेत्यांमध्ये चर्चा झाली असून, अंतिम यादी बनवण्यात येत आहे. त्याला राष्ट्रीय नेत्यांची अनुमती घेतल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील, अशी माहिती आहे. हे फेरबदल नक्की कधी होणार? याबाबत मात्र साशंकता आहे. मात्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी हे सारे अनिवार्य बनणार आहे, कारण नव्या मंत्र्यांना खात्याचा अभ्यास आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ अपेक्षित आहे. याबरोबरच सभापती तवडकर त्यांच्या जागेवर सभापतींची निवड करावी लागणार आहे.