मडगाव : कुशावतीच्या पुरात पारोडा गाव बुडाल्यानंतर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी पारोड्यातील नाले आणि गटार साफ करण्यासाठी काढलेले आदेश म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा अर्थ काढला जाऊ लागला आहे. पुराचे पाणी काराळीपासून ते गुडीपर्यंत पाहेचले होते. अंतर्गत भागात राहणार्या लोकांनी ये-जा करण्यासाठी होड्या बाहेर काढल्या होत्या. सर्वत्र भीतीचे वातावरण असताना दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी नाले आणि गटार साफ करण्याचे आदेश काढून सर्वांना गोंधळात टाकले आहे. बुडालेल्या गावातील गटारे कशी साफ करावी, हा प्रश्न लोकांना पडला आहे.
गुरुवारी पहाटेपासून पुराचे पाणी मुख्य रस्त्यापर्यंत येऊ लागले होते. सकाळी दहाच्या सुमारास काराळीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. दुपारपर्यंत पारोड्याचा मुख्य बाजार पाण्यात बुडाला. रस्त्यानजिकच्या सर्व घरांत पाणी शिरले होते. दर मिनिटाला पाणी वाढू लागल्याने रस्ता शोधणे कठीण झालेले असताना पोलिसांनी बॅरिकेडस् लावून मडगावला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तरीही काही लोक रस्त्याचा अंदाज घेत पाण्यातून वाट काढत आपल्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते.
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स यांनी गुरुवारी खास आदेश काढून पारोडा भागातील नाले आणि गटार उपसण्याचे आदेश जारी केले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग सहाचे कार्यकारी अभियंता यांना कालवे, नाले आणि गटार उपसून 48 तासांच्या आत त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर जलस्रोत आणि वीज खात्याला वीज खांब, ट्रान्सफॉर्मर तसेच वीज सुविधांची पाहणी करावी आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित उपजिल्हाधिकार्यांना सूचित करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
कुशावतीला आलेल्या पुरात पारोडा बुडाल्याच्या घटनेनंतर विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी पारोडा येथे भेट देऊन घटनेची पाहणी केली. दरवर्षी येथील लोकांना पुराच्या पाण्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अधिवेशनात हा विषय मांडूनसुद्धा सरकारला येथील ग्रामस्थांना न्याय देता आला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. या पाहणी दरम्यान, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पूरप्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आश्वासन देऊन सरकारने सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यांना पाणी लावले आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.