म्हापसा : गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सुमारे 5 अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे 50 लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान घडली. भर लोकवस्तीत घडलेल्या या दरोड्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. दोनापावला येथे घडलेल्या दरोड्याची पुनरावृत्ती म्हापशात झाली आहे. दरम्यान, तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपुरी येथील भर वस्तीत असलेल्या डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्याच्या बाजूच्या खिडकीचे ग्रील कापून सुमारे 5 दरोडेखोरांनी पहाटे 3 च्या सुमारास त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी डॉ. घाणेकर, त्यांची पत्नी, मुलगी व आई यांना घरातील चादरीच्या सहाय्याने बांधून ठेवले व घाणेकर यांना मारहाण केली. त्यांच्याकडे दागिन्यांची मागणी केली असता त्यांनी दागिने बँकेच्या लॉकरमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडे रोख रकमेची मागणी केली. रोख रक्कम व दागिन्यांची शोधाशोध करण्यासाठी त्यांनी कपाटे फोडली तसेच सर्व घरात उलथापालथ केली. शेवटी त्यांना 8 ते 10 लाखांची रोख रक्कम मिळाली. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले व त्यांच्या पत्नीला बाथरूममध्ये डांबून टाकले.
आपली ओळख पटू नये, यासाठी दरोडेखोरांनी जाताना घरातील सीसीटीव्ही रेकॉर्डर आणि चौघांचे चार मोबाईल चोरून नेले. म्हापसा पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक विल्सन डिसोझा, निरीक्षक निखिल पालेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकासही पाचारण करण्यात आले.
पणजी : नागाळी- दोनापावला येथील उद्योजक जयप्रकाश धेंपे यांच्या बंगल्यावर 19 एप्रिल रोजी रात्री असाच सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेला पाच महिने उलटले. मात्र, प्रकरणाचा तपास लागला नाही. सुमारे 1 किलो सोने आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम पळवून नेणार्या टोळीचा तपास अद्यापही सुरूच आहे. म्हापशातील या घटनेनंतर दोनापावला येथील दरोड्याची चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणातील संशयित अद्यापही मोकाटच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, या टोळीमागे आंतराराज्य टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
यावर्षी दोनापावला येथे व आता गणेशपुरी (म्हापसा) या दोन्ही दरोड्यांमधील दरोडेखोरांची चोरी करण्याची पद्धतीत साम्य असल्याचे दिसून येत आहे. दरोडेखोरांनी अभ्यास करूनच हा दरोडा घातला आहे. धनाढ्य व्यक्तींचे बंगले त्यांनी लक्ष्य केले. बंगल्यामधील लोकांना शस्त्रांचा धाक दाखवून व त्यांना बांधून खोल्यांमध्ये डांबून ठेवले. कपाटे फोडून दागिने व रोख रक्कम चोरून पसार झाले. आजुबाजूला वस्ती असूनही कोणालाही त्याचा मागमूस लागू दिला नाही. दोनापावला येथील दरोड्यातील दरोडेखोर हे बांगलादेशी होते. त्यामुळे पुन्हा या बांगलादेशी टोळी गोव्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. घाणेकर यांच्या आई पहाटे 3 वा. चहा पिण्यासाठी उठल्या होत्या. त्यांनी केलेला चहाही दरोडेखोरांनी पिला. तसेच फ्रिज व टेबलावर ठेवलेले खाद्यपदार्थही तसेच फळांवरही ताव मारला.
पहाटे खिडकीचे ग्रील्स कापून एका दरोडेखोराने बंगल्याच्या परिसरात प्रवेश केला व घराचा मुख्य दरवाजा उघडून इतर चोरट्यांना आत घेतले. त्यांच्याकडे चाकू, सुरे व लोखंडी सळ्या होत्या. यावेळी डॉ. घाणेकर व त्यांच्या पत्नी एका खोलीत झोपले होते, तर मुलगी व आई अन्य खोलीत झोपले होते. दरोडेखोरांनी त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करून चादरी फाडून त्यांचे हात-पाय बांधले व त्यांच्या तोंडात कोंबले.
घरात शोधाशोध करताना ते दरोडेखोर सुरी व चाकूचा धाक दाखवून त्यांना धमकावत होते. ते जिवंत मारण्याची धमकी देत असले तरी त्यांनी कोणालाही जखमी केले नाही. डॉ. घाणेकर यांना मात्र त्यांनी हाताच्या बुक्क्यांनी मारहाण केली. सर्वजण हिंदीतून बोलत होते, तसेच त्यांनी बुरखे घातले होते. पळून जाताना त्यांची सर्व हत्यारे घराबाहेरच ठेवलेली सापडली.
दरोडेखोर साधारण 5 वाजेपर्यंत डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यात होते. त्यानंतर जाताना त्यांनी त्यांची जीए-03-पी-7187 या क्रमांकाची कार चोरून नेली. दुपारी ही कार पणजीजवळील पुलाखाली पोलिसांना सापडली.