Ravi Naik passes away file photo
गोवा

Ravi Naik passes away: गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

गोवा राज्याचे कृषी मंत्री आणि दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मोहन कारंडे

Ravi Naik passes away

पणजी : गोवा राज्याचे कृषी मंत्री आणि दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. फोंडा येथील सावईकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

नाईक यांना पहाटे त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ फोंडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचे पार्थिव नंतर अंत्यदर्शनासाठी फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याच्या विविध भागातून राजकीय नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे.

तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केला. "गोवा राज्याच्या राजकारणातील एक दिग्गज आधारस्तंभ आज हरपला आहे. मुख्यमंत्री आणि विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून दशकाहून अधिक काळ त्यांनी राज्याला दिलेली समर्पित सेवा, विकास आणि लोकाभिमुख कारभार यामुळे गोव्याच्या राजकारणावर त्यांची अमिट छाप राहिली आहे," असे सावंत म्हणाले. त्यांच्या निधनामुळे राज्यामध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

रवी नाईक कोण होते? राजकीय प्रवास

रवी नाईक यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रदीर्घ आणि चढ-उतारांचा ठरला. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप), काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.

  • ते एकूण सात वेळा आमदार म्हणून निवडून आले. यात सहा वेळा फोंडा मतदारसंघातून आणि एकदा मार्केम मतदारसंघातून त्यांनी प्रतिनिधित्व केले.

  • १९८४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मगोपच्या तिकिटावर फोंडा मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला.

  • ते दोन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा त्यांनी जानेवारी १९९१ ते मे १९९३ या काळात 'प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंट' या आघाडी सरकारचे नेतृत्व केले.

  • १९९४ मध्ये त्यांनी ६ दिवसांसाठी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, जो गोव्याच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचा मुख्यमंत्रीकाळ होता.

  • १९९८ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर गोव्यातून खासदार म्हणूनही निवडून गेले होते.

  • त्यांनी २०१८ मध्ये काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर फोंडा मतदारसंघातून विजय मिळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT