म्हापसा : पश्चिम बंगालमधील टीव्ही मालिकांचे निर्माते श्याम सुंदर डे यांना धमकावून त्यांचे अपहरण व 23 लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी टीव्ही कलाकार कुणाल वर्मा, पूजा बॅनर्जी ऊर्फ पूजा बोस, पीयूष कोठारी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निर्माता श्याम सुंदर डे यांच्या पत्नी मलविका डे (रा. कोलकाता) यांनी या प्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांत तक्रार दिली होती. पश्चिम बंगाल पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल करून हे प्रकरण कळंगुट पोलिसांकडे वर्ग केले होते.
त्यानुसार कळंगुट पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी सुरू केली आहे. हा प्रकार 31 मे ते 4 जून दरम्यान कळंगुट येथे घडला होता. पोलिस तक्रारीनुसार, संशयितांनी संगनमताने गुन्हेगारी कट रचून श्यामसुंदर डे हे आपल्या सहकार्यांसह भाड्याच्या कारने प्रवास करताना त्यांना अडवले व त्यांच्याच कारमधून जबरदस्तीने अपहरण केले. तसेच हणजूणमधील एका हॉटेलमध्ये आणि साळगावमधील एका व्हिलामध्ये त्यांना कोंडून ठेवून मारहाण केली. शिवाय ड्रग्ज तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून 23 लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.