वास्को : येथे मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) जे काही करते ते ठिक नाही. मनाला वाटते तेथे फाटक उभारते, मनाला वाटते ते बंद करते, एमपीएने आम्हाला विकत घेतले की काय, असा संतप्त सवाल वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी शुक्रवारी (दि. 27) उपस्थित केला. येथील आयओसी चौकातील उड्डाण पदपूल दुरुस्तीसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेऊन बंद करण्याची कार्यवाही सुरू केली. एमपीएने सदर पूल त्वरित पुन्हा खुला करावा असे आवाहन त्यांनी केले. एमपीएने नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नये, असे ते म्हणाले.
देस्तरोवाडो व आसपास परिसरातील रहिवाशी पूर्वी एमपीटीच्या भागातून रेल्वे मार्ग ओलांडून शहर भागात येत होते. एमपीटीने सुरक्षासाठी तेथे फाटके उभारून सुरक्षा रक्षक ठेवल्यावर तेथील रहिवाशांना शहर भागात मोठा फेरा घेऊन यावे लागत होते. याप्रकरणी आवाज उठविल्यावर दखल घेताना देस्तरोवाडो ते आयओसी चौक दरम्यान एक उड्डाण पदपूल उभारला आला. त्यामुळे रहिवाशांची समस्या दूर झाली होती. या पुलाचा एक भाग मुरगाव मतदारसंघात, तर दुसरा भाग वास्को मतदारसंघात आहे. पुलाच्या दुरुस्तीसंबंधी आताच्या एमपीएने तेथे सुरक्षा देणारा फलक लावला आहे. सदर पूल असुरक्षित झाल्याने दुरुस्ती व देखभाल कामासाठी दि. 20 जूनपासून तो तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
पादचार्यांनी पर्यायी मार्गाचा स्वीकार करावा, असे फलकावरील नोटिशीत म्हटले आहे. 20 जूनऐवजी सदर पूल 27 जुनला उड्डाणपूल बंद करण्याचे काम हाती घेण्यात आले. याप्रकरणी माहिती मिळाल्याने आमदार साळकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांनी तेथे येऊन संबंधित अधिकार्याला जाब विचारला.
हा एकंदर प्रकाराबद्दल आमदार साळकर हे संतप्त झाल्याचे दिसून आले. या उड्डाण पदपुलाचा वापर सर्वसामान्य नागरिक तसेच तेथील वालंकिणी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाणारे भाविक करतात. सप्ताहाप्रसंगी हा पुलाचा अधिकाअधिक वापर करण्यात येतो. मुरगाव पालिकेला माहिती न देता एमपीएने मोठा निर्णय घेतला आहे. यामागील एमपीएची भूमिका काय आहे, असा प्रश्न साळकर यांनी विचारला. उपजिल्हाधिकारी, मामलेदार, मुरगाव पालिका, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना विश्वासात न घेता, त्यांना न विचारता एमपीए अशाप्रकारची कृती करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उड्डाण पुलाची उपजिल्हाधिकारी, मामलेदार, आमदार, मुरगाव पालिका इत्यादीसमावेत संयुक्त पाहणी करण्याची गरज होती. एमपीएने संबंधित सरकारी यंत्रणांना माहिती देऊन संयुक्त पाहणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सदर उड्डाणपूल असुरक्षित आहे, तर त्यासंबंधी संबंधित आमदारांना माहिती देण्याची गरज होती; परंतु आता एमपीए स्वतः सर्व काही झाले आहे. नागरिकांशी संबंधित काही निर्णय घेत असाल, तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला माहिती द्या. आम्ही लोकांना विश्वासात घेऊन त्यांना संबंधित माहिती देऊ शकतो, असे साळकर म्हणाले.
नगराध्यक्ष बोरकर म्हणाले की, सदर पूल असुरक्षित झाला आहे. तो दुरुस्त करण्याची गरज आहे, तर त्यासंबंधी मुरगाव पालिकेला आगाऊ माहिती देण्याची गरज होती. परंतु, कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सदर उड्डाणपूल किती दिवस बंद राहणार हे सुध्दा स्पष्ट केला नाही. सदर पूल वास्को सप्ताहापूर्वी दुरुस्त होणार, काय असा सवाल त्यांनी विचारला. जर ते शक्य नसेल, तर सर्वांना विश्वासात घेऊन सप्ताहानंतर पुलाचे दुरुस्ती काम हाती घेणे योग्य ठरेल.