मडगाव : दिवाळीच्या सोनेरी दिवसाचा उजेड झळाळण्यापूर्वीच कुडचडेवासीयांच्या आयुष्यात काळोख पसरवणारी दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्री घडली. कुडचडे येथील जीसुडा मार्केटला लागलेल्या भीषण आगीत तब्बल बावीस दुकाने आगीत भस्म झाली. डोळ्यांत स्वप्नं ठेवून जगणार्या व्यापार्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. समाजसेवक रोहन गावस देसाई यांनी सोमवारी घटनास्थळाची पाहणी केली व आगीत बेचिराख झालेल्या 15 व्यापार्यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
एका बाजूला नरकासुर स्पर्धेचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर, रंगांची रोषणाई... आणि दुसर्या बाजूला आगीच्या ज्वाळांनी व्यापार्यांचे संसार राखेत बदलले. हा विरोधाभास कुडचडेवासीयांनी पाहिला. फळविक्रेते, फुलविक्रेते, भाजीविक्रेते आणि किरकोळ व्यापार्यांचे सर्व साहित्य, साठा, तर काहींचे जीवनभराचे कष्ट या आगीत जळाले. सायंकाळी दुकान बंद करून “उद्या दिवाळीच्या खरेदीची गर्दी वाढेल” या आशेने झोपलेल्या व्यापार्यांचा संसार पहाटेच्या आत राखेत मिळाला.
“आमचं सगळं संपलं... आता दिवाळी कसली साजरी करू?” असा प्रश्न विचारताना सुषमा नाईक यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू अनेक कुटुंबांच्या वेदना सांगून गेले. आगीची माहिती मिळताच कुडचडे अग्निशामक दलाचे अधिकारी दामोदर जांबावलीकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अवघ्या वीस मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. दोन पाण्याचे बंब, सुमारे वीस हजार लिटर पाणी आणि स्थानिक तरुणांच्या धाडसी मदतीमुळे ही आग आणखी पसरू शकली नाही, हेच दिलासादायक ठरले.