मडगाव : मुंगूल गोळीबार आणि गँगवॉरमधील कुख्यात 28 गुन्हेगारांच्या अटकेमुळे दक्षिण गोव्यातील गुन्हेगारीचा आकडाही घटू लागला आहे. मात्र, दक्षिण गोव्याचा पाब्लो एस्कोबार म्हणून परिचित असलेल्या कुख्यात पेडलर बॉयच्या अटकेचा अमलीपदार्थ व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. पूर्वी 700 ग्रॅमच्या गांजाच्या पाकिटासाठी पाचशे रुपये मोजावे लागत होते. त्यात आता केवळ शंभर रुपयांच्या छोट्या पाकिटांची धमाकेदार विक्री सुरू झाली आहे.
दक्षिण गोव्याच्या केपे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शंभर रुपयांची पाकिटे विकली जात आहेत. चिंतेची बाब म्हणजे पॉकेटमनीच्या किमतीत उपलब्ध होत असलेला हा गांजा आता शाळा आणि महाविद्यालयांपर्यंतही पोहोचलेला आहे. विशेष म्हणजे दक्षिण गोव्यात गांजाच्या पुरवठ्यासाठी प्रसिद्ध असलेला बॉय हा केपे भागातील कुख्यात ड्रग पेडलर मुंगूल गोळीबार प्रकरणात अटकेत असतानाही दक्षिण गोव्यातील गांजाच्या विक्री व्यवसायावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. उलट पूर्वी सातशे ग्रॅमच्या गांजाच्या एका पाकिटासाठी पाचशे ते सातशे रुपये मोजावे लागत होते. पण आता लोकांचा खिशाला परवडेल अशा स्वरूपाच्या पाकिटांची विक्री सुरू करण्यात आलेली आहे. गोळीबार प्रकरणात बॉय याला अटक करण्यात आलेली असताना गांजाच्या विक्री पद्धतीत अचानक करण्यात आलेला बदल दक्षिण गोव्यात चर्चेचा विषय बनला आहेत. सुमारे 1 ग्रॅम वजन असलेल्या गांजाची पालवी छोट्या पाकिटात घालून त्याची विक्री करण्याचा सपाटा दक्षिण गोव्यात सुरू आहे. शंभर रुपयांमध्ये एक रोल बनेल एवढा गांजा प्राप्त होत आहे.
ऑगस्ट महिन्यात मुंगूल येथे भर रस्त्यात टोळीयुद्ध भडकले होते. ड्रग्ज प्रकरणातील अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते. एका टोळीकडून दुसर्या टोळीतील सदस्याच्या वाहनावर गोळीबारही करण्यात आला होता. या प्रकरणात 28 पेक्षा जास्त हिस्ट्री शीटर्सना अटक करण्यात आली आहे. ज्यात केपे भागातील त्या कुख्यात पेडलरचाही समावेश आहे. सांगे, कुडचडे, सावर्डे, तसेच केपे व सासष्टी तालुक्यात त्याने आपले नेटवर्क पसरवले आहे.
गांजा हा कर्नाटकाचे हसन, गदगसारख्या भागात उगवतो. मात्र, या गांजाच्या तुलनेत चांगल्या दर्जाच्या गांजाची शेती बिहार, ओरिसा आणि हिमाचल प्रदेशमधील कसोलसारख्या गावात केली जाते. ग्रीन गांजा, ब्लॅक चरस, मलाना व कुशसारख्या नैसर्गिक प्रकारच्या गांजाचा पुरवठा केवळ बॉयच करत असल्यामुळे, या बॉयचे नाव अमलीपदार्थाच्या दुनियेत लोकप्रिय आहे. बॉय हा कधीच ड्रग्ज विकताना पकडण्यात आलेला नाही. त्याने दक्षिण गोव्यात जबरदस्त नेटवर्क उभारले आहे.
केपे परिसरात गस्त वाढवली : पोलिस निरीक्षक
त्या पेडलरला अटक केल्यानंतर केपे परिसरातून अमलीपदार्थांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. पोलिस गस्तही वाढवण्यात आली असून विविध ठिकाणी पोलिसांची संख्याही वाढविण्यात आल्याचे केपेचे पोलिस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी सांगितले.