म्हापसा : गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. घाणेकर यांच्या घरावर घातलेल्या दरोड्याप्रकरणी गोवा पोलिसांना यश आले आहे. या दरोड्याशी संबंधित दोघा दरोडेखोरांना गोवा पोलिसांनी बंगळूर व हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे. दोघा संशयितांना अटक करण्यात आल्यामुळे इतरही संशयित लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंगळवार, दि.7 रोजी पहाटे 3 च्या सुमारास डॉ. महेंद्र मोहन घाणेकर यांच्या बंगल्यात सात दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. डॉ. घाणेकर त्यांची पत्नी मुलगी व 80 वर्षीय आईला मारहाण करून चाकू, सूर्याचा धाक दाखवून 10 ते 12 लाख रुपये रोख व दागिने असा सुमारे 35 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. पळून जाताना त्यांनी त्यांच्या घरातील सीसीटीव्ही रेकॉर्डर व चौघांचे मोबाईल चोरून नेले होते. हे मोबाईल त्यांनी जवळच टाकल्याचे पोलिसांना समजले. तसेच या दरोडेखोरांनी जाताना त्यांची कारही पळवून नेली होती; ती नंतर जी पुलाखाली पोलिसांना सापडली. हे दरोडेखोर पणजी येथून टॅक्सी घेऊन बेळगावला गेल्याचे एका टॅक्सी चालकाने पोलिसांना सांगितले.
या दरोडेखोरांनी बुरखे घातले असल्याकारणाने त्यांची ओळख पटली नसली तरी दोनापावला येथे घातलेल्या दरोड्यात व या दरोड्यात साधर्म्य दिसून आले असून पोलिस त्याद़ृष्टीने तपास करत आहेत. म्हापसा व इतर पोलिस स्थानकातील पोलिसांचे गट करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले होते.
पोलिसांनी एक कारचालक आणि त्याच्या सहकार्याची चौकशी सुरू केली आहे. लवकरच या दरोड्यातील सर्व दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागतील, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.