पणजी : एका बसचे चाक पायावरून गेल्याने 40 टक्केेपक्षा जास्त कायमचे अपंगत्व आलेल्या भिकाजी सावंत या मच्छीमाराला उत्तर गोव्यातील एका न्यायालयाने व्याजासह 22.4 लाख रुपयांची भरपाई सुनावली. 2013 मध्ये हा अपघात घडला होता. न्यायालयाने नमूद केले की, सावंत त्यावेळी 44 वर्षांचे होते आणि दुखापतीमुळे त्यांचे 16 वर्षांचे उत्पन्न आणि आयुष्यातील चांगल्या संधी गमवाव्या लागल्या. बस चालकाने प्रवाशांना उतरवताना आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले नाही, त्याने सावधगिरी बाळगली नाही.
त्यामुळे बसचे चाक सावंत यांच्या पायावरून गेले. असे नमूद करून न्यायालयाने सावंत यांना दोन वेगवेगळ्या शस्त्रक्रियेसाठी एकूण 5 लाख देण्याचे आदेश दिले. 2013 मध्ये, आमोणे येथे बसमधून उतरत असताना, चालकाने बस मागे घेतली. ज्यामुळे सावंत दारावर आदळले आणि जमिनीवर पडले. त्यानंतर बसचे चाक त्यांच्या पायावरून गेले. त्यांच्या पायाच्या सात शस्त्रक्रिया झाल्या.
सावंत हे मच्छीमारी व्यवसाय करत होते. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, ते दरमहा 15,000 रुपये कमवत होते, परंतु पुराव्याअभावी न्यायालयाने ती रक्कम 10,000 रुपये निश्चित केली व एकूण नुकसान भरपाई म्हणून 22.4 लाख रुपये देण्याचे आदेश दिले.