पणजी : ‘स्मार्ट सिटी’प्रकल्पांतर्गत डीबी रोडवरील फेरी पॉईंटजवळ उभारलेला इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग झोन पावसाच्या पाण्यात बुडाल्याची घटना गुरुवारी समोर आली. मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चार्जिंग केंद्राची सुविधा ठप्प झाली आहे.
चार्जिंग स्टेशन परिसरात पाणी शिरल्याने तांत्रिक उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव चार्जिंग सेवा तत्काळ थांबवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना आणि वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या मते, स्मार्ट सिटी अंतर्गत सुविधा उभारल्या असल्या तरी त्यासाठी योग्य ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली नाही, अशी तक्रार लोक करत आहेत. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील अंमलबजावणी आणि नियोजनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जलनिस्सारण व्यवस्थेचा अभाव आणि निकृष्ट कामकाजामुळे वारंवार अशा समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.