वास्को ः खारीवाडा फिशिंग जेटीची स्थिती अतिशय दयनीय झाली असून, त्या परिसरात वावरणेही धोकादायक बनले आहे. मत्स्योद्योग खात्याने गोव्यातील इतर फिशिंग जेटींच्या सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असताना, खारीवाडा जेटीकडे मात्र कायम दुर्लक्ष केले जाते, असा आरोप माजी मंत्री आणि गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष फिलिप जुझे डिसोझा यांनी केला आहे.
सरकारने तातडीने दुरुस्तीची कामे सुरू केली नाहीत, तर आम्हीच स्वखर्चाने ती कामे पार पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. डिसोझा म्हणाले की, ‘खारीवाडा जेटीची योग्य देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज वारंवार अधोरेखित केली जाते, तरीही सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्षच केले जाते. सुमारे दोनशे फिशिंग बोटी या जेटीचा वापर करतात. मात्र जेटीची दुर्दशा झाल्याने लाकडी बोटी नांगरणे कठीण झाले आहे. काही वेळा बोटी धक्क्याला आपटल्याने मालकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पूर्वी ही जेटी मुरगाव बंदर प्राधिकरणाने तात्पुरत्या स्वरूपात बांधली होती. एमपीटीचा अधिकार असल्याने सरकारला सुधारणा करता येत नव्हती. परंतु असो.च्या पाठपुराव्यानंतर एमपीटीने ‘ना हरकत दाखला’ दिला असून, तरीदेखील दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत, असे त्यांनी नमूद केले. जेटीवर सुलभ शौचालयाची सोय करण्याचे आश्वासन दिले गेले असले, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बोटीवरील कामगारांना उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जावे लागत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.