पणजी : पणजीतील मासळी बाजारात सध्या खाडीतील माशांची आवक कमी झाली आहे. पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने खाडीतील माशांना मोठी मागणी असते. आता समुद्रातील मासे मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत, तर खाडीतील माशांना स्थानिक पातळीवर ग्राहक उपलब्ध होत असल्याने बाजारात मासे विक्रीसाठी आणणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात आले. सध्या पर्यटक वाढल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, या रविवारी २० ऑक्टोबर रोजी इसवणचा दर ६०० ते ७०० रुपये किलो होता. गेले अनेक आठवडे पापलेटचा दर मात्र इसवणाच्या दरापेक्षा अधिक आहे. याही रविवारी २० रोजी तो ९०० ते १,००० रुपये किलो असाच होता. छोट्या पापलेटचा दर मात्र ५०० च्या आसपास होता. सरंगा ३०० ते ५०० रुपये, तर प्रॉन्स २५० ते ३०० रुपये किलो दराने मिळत होते.
दरम्यान, बाजारात समुद्रातील प्रॉन्सप्रमाणे फार्ममध्ये पाळलेले प्रॉन्सदेखील मोठ्या प्रमाणावर आले होते. दोन्ही प्रॉन्सचा दर तुलनेत समान असला तरी अनेक खवय्ये समुद्रातील प्रॉन्सनाच पसंती देतात. दोघांच्या चवीत बराच फरक असतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
मोठी पापलेट: रु. ९०० ते १,००० किलो, छोटी पापलेट: रु. ५०० किलो, इसवण : रु. ६०० ते ७०० किलो, सरंगा: रु. ३०० ते ५०० किलो, मोठे बांगडे : रु. २००-२५० किलो, छोटे बांगडे: रु. १००-१५० किलो, पेडवे: रु. १०० वाटा, वेर्ले : रु. २०० वाटा, कर्ली: रु. १०० ते ३०० नग, तारली : रु. २००-३०० किलो, छोटे पेडवे: रु. १०० वाटा, लेपो: रु. २०० किलो, सौंदाळे : रु. २०० ते ३०० किलो, मोरी: रु. ४०० ते ५०० किलो.