वाळपई : वाळपई-होंडा मार्गावर रेडीघाट येथे शुक्रवारी रात्री कंटेनरे दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात साखळी येथील वनिता मोर्लेकर ऊर्फ पोकळे यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास वनिता मोर्लेकर ऊर्फ पोकळे ही जीए 04 जे 7926 दुचाकीवरून वाळपईहून होंडाच्या दिशेने जात होती. रेडीघाट येथे समोरून येणार्या कंटेनरने एमएच 12 एक्स 2564 या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील वनिता मोर्लेकर व चालक गंभीर जखमी झाला. वनिता मोर्लेकर यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. कामावरून सुटल्यानंतर त्या घरी जात होत्या. वनिता या वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कामास होत्या. आठ वाजता त्यांची ड्युटी संपल्यानंतर त्या साखळी येथील आपल्या घरी जात होती.
यावेळी प्रवासी बसेस नसल्यामुळे त्यांनी एका दुचाकीवरून लिफ्ट घेतली होती. त्यांच्या पश्चात मुलगा व पती असा परिवार आहे. वनिता यांचे मूळ कोपर्डे येथील आहेत. साखळी येथे त्यांचे सासर आहे. यामुळे कामावरून सुटल्यानंतर त्या साखळी येथे घरी जात होत्या. कंटेनर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पलायनाचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला वाळपई या ठिकाणी प्रमुख रस्त्यावर अडवले. त्याला पकडून वाळपई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर व त्याच्या चालकाला ताब्यात घेतलेले आहे. त्याच्यावर अपघात प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पंचनामा करून वनिता मोर्लेकर यांचा मृतदेह गोमेकॉ इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सदर अपघात हा मुख्य रस्त्यावर झाल्यामुळे या रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. मद्यपी चालकावर कठोर कारवाईची प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.