पणजी : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे आव्हान स्वीकारून आपल्या काळात पूर्ण केलेला एकतरी प्रकल्प दाखवावा, दामू नाईक यांच्यावर विनाकारण टीका करू नये. अशी टीका भाजप व स्वाभिमानी फातोर्डावासीय कदापी सहन करणार नाहीत, असा इशारा भाजपचे मुख्य प्रवक्ते तथा आमदार दाजी साळकर यांनी पणजीतील पत्रकार परिषदेत दिला आहे.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर, सर्वानंद भगत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष आणि जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कैकर उपस्थित होते.
आमदार साळकर म्हणाले, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या कामाच्या क्षमतेमुळे आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांना भाजपने राज्याचे अध्यक्षपद दिलेले आहे. एका सामान्य एक आमदार असलेल्या पक्षाचे ते अध्यक्ष नाहीत. याची जाणीव सरदेसाई यांनी ठेवावी व नाईक यांच्यावर टीका करताना विचार करावा. अध्यक्ष झाल्यानंतर नाईक यांनी सर्व मतदारसंघात मेळावे घेऊन ते यशस्वी करून दाखवले आहेत.
2012 मध्ये मतदारसंघाच्या फेररचनेमुळे भाजपची मते कुडतरीत गेली आणि विजय सरदेसाई यांना विजय मिळाला. न पेक्षा दामू नाईक हेच विजयी झाले असते. दामू नाईक यांनी 2007 साली विजय सरदेसाई यांचा पराभव केला होता आणि येत्या निवडणुकीतही निश्चितपणे विजय सरदेसाई यांचा पराभव होणार असल्याचे साळकर म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्षांना नको ती विशेषणे लावून त्यांचा अपमान केल्यास भाजपचे कार्यकर्ते गप्प राहणार नाहीत. नाईक यांच्याच नेतृत्वाखाली 2027 मध्ये भाजपला 27 जागा निश्चितपणे मिळतील, असा दावा साळकर यांनी यावेळी केला.
फातोर्डामध्ये झालेले जिल्हा इस्पितळ, रस्ता रुंदीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, आयटीआय, सिग्नेचर आदी मोठे प्रकल्प दामू नाईक यांच्या आमदारकीच्या काळात आले होते. विजय सरदेसाई यांनी एकही प्रकल्प आणलेला नाही. आणलेला असल्यास त्यांनी तो जाहीरपणे सांगावा, असे आव्हान आमदार साळकर यांनी दिले.
भाजपच्या फातोर्डा येथील मेळाव्यात नवे आणि जुने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्यामुळे आमदार सरदेसाई बिथरले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी नाईक यांच्यावर नाहक टीका करण्यास सुरुवात केल्याचे सरचिटणीस कुंकळ्येकर यांनी सांगितले.