पणजी : माजी मंत्री व प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना भाजपने अनेकदा ताकीद दिली होती. मी त्यांच्याबद्दल माध्यमांशी बोलण्यापूर्वी गावडे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे आपल्याशी भाजप प्रदेशाध्यक्षांनी चर्चा केली नाही, हा गावडे यांनी केलेला दावा खोटा आहे, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले, गावडे यांनी आपणास उद्देशून ‘उखल्ली जीभ लायली टाळ्याक’ अशी जी टीका केली आहे, ती चुकीची आहे.
माझे विधान करण्यापूर्वी मी गावडे यांच्याशी बोललो होतो. मडगाव येथील पक्षाच्या कार्यालयात भेटलो होतो. असे सांगून पक्षाने गावडे यांना शिस्तीत राहण्याबाबत, वादग्रस्त विधाने न करण्याबाबत अनेकदा ताकीद दिली होती. तरी ते बोलत राहिले. काही दिवसांपूर्वी त्यांनी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली होती, त्यावेळी त्यांनी केंद्रीय नेत्यांना कळवले, आपणास केंद्रीय नेत्यांनी विचारले. सरकारमधील दोन मंत्री असे एकमेकांवर टीका करू शकत नाहीत. हे गावडे यांना कळायला हवे होते. माजी प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या काळातही गावडे यांना पक्ष शिस्तीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी संयम पाळला नाही, असे नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, गोविंद गावडे हे भाजपची पक्षशिस्त पाळण्यास तयार नव्हते. त्यांना अनेक संधी देऊनही त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.