भोस्ते मानवी सांगाडा प्रकरण. Pudhari File Photo
गोवा

भोस्ते मानवी सांगाडा प्रकरण : योगेशच्या डायरीत दडलंय काय?

पुढारी वृत्तसेवा
दीपक जाधव

पणजी : भोस्ते घाटातील जंगलात सापडलेला मानवी सांगाडा आणि त्याची माहिती देणारा योगेश पिंपळ आर्या (30, मूळ रा. सावंतवाडी आजगाव, सध्या रा. आल्त बेती) यांचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. योगेश याला दैनंदिनी लिहिण्याची सवय असल्याचे समोर आल्याने त्याच्या डायरीचा शोध घेण्यासाठी खेड गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या आल्त बेती येथील भाड्याच्या खोलीची तपासणी केली. मात्र, खोलीत त्याची डायरी सापडली नसल्याने त्या डायरीमध्ये दडलंय काय, हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सदर डायरीसंदर्भात पुन्हा योगेश याची चौकशी करणार असल्याची माहिती खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गालगत भोस्ते घाटातील जंगलात अनोळखी मृतदेहाची माहिती पोलिसांना देणार्‍या योगेश आर्या याच्या चौकशीत अनेक विसंगती असल्याचे दिसून येत आहे. योगेश याने दिलेल्या जबाबानुसार, तो 6 सप्टेेंबरला पहाटे 3 वा. आल्त बेती येथून फोंड्याला निघाला होता. वाटेत जुने गोवे येथे त्याचे भान हरपले. तो 7 सप्टेंबर रोजी भानावर आला. त्यावेळी तो सुरत रेल्वेस्थानकावर होता. मात्र, तो सुरतला कसा पोचला, ते आठवत नसल्याचे त्याने सांगितले आहे.

16 ऑगस्टपासून स्वप्नात मदत मागणार्‍या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी तो 10 सप्टेंबरला खेड येथे दाखल झाला. त्यापुढील दहा दिवस तो रेल्वे स्थानक, बस स्थानक, महामार्ग, भोस्ते घाट परिसरात फिरत होता. योगेश याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली मृतदेह आढळून आला. त्यामुळे पोलिसही चक्रावले होते. मृतदेहाचा आणि योगेशचा नेमका संबंध काय, याचा तपास करीत असले तरी अद्यापही कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

नोकरी बदलल्याची माहिती लपविली

योगेश हा पूर्वी कुंडई औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनामध्ये कामाला होता. दोन महिन्यांपूर्वी ती नोकरी सोडून तो पणजी पाटो येथील एका आस्थापनात काम करीत होता. मात्र, नोकरी बदलल्याची कोणतीही माहिती त्याने खोलीत राहणार्‍या मित्रांनाही दिली नव्हती. खेड पोलिस तपासाला आल्यानंतर त्याने नोकरी बदलल्याची माहिती मित्रांना मिळाली. त्यामुळे नोकरी बदलल्याची माहिती त्याने मित्रांपासूनही का लपविली, अशी चर्चा सध्या आल्त बेती परिसरात सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT