पणजी : आसाममधील डेरगाव येथील लचित बारफुका पोलिस अकादमीत अत्याधुनिक प्रशिक्षित गोवा पोलिसांच्या इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) 700 जवान 21 ऑगस्ट रोजी गोवा पोलिस सेवेत रूजू होणार असल्याची माहिती पोलिस प्रशिक्षण अधीक्षक, कमांडर विश्राम बोरकर यांनी दिली आहे.
गोवा पोलिसांच्या तीन इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) 700 जवानांची प्रशिक्षणानंतरची पासिंग आऊट परेड मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आसाममध्ये पार पडली. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा व पोलिस महासंचालक अलोक कुमार उपस्थित होते.
पोलिसांच्या तीन बटालियनच्या 700 जवानांनी आसाम पोलिस अकादमीत तब्बल 10 महिने शारीरिक, मानसिक व तांत्रिक असे खडतर प्रशिक्षण घेतले. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेंतर्गत या प्रशिक्षणात शारीरिक तंदुरुस्ती व सहनशक्ती वाढविण्यासाठी दररोज कठोर व्यायाम घेण्यात आला. याशिवाय अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळणी व नेमबाजी सराव, दंगली नियंत्रण व जमाव व्यवस्थापन तंत्र, दहशतवादविरोधी कारवाई आणि शोधमोहीम पद्धती, स्फोटके शोधणे व निकामी करण्याचे कौशल्य, नैसर्गिक आपत्ती व बचावकार्य, मानवी हक्क, व नैतिक मूल्यांचे पालन, नेतृत्वगुण आणि संघटित कार्यपद्धती या विषयांवर प्रशिक्षण दिले गेले. अकादमीतील अत्याधुनिक ड्रिल ग्राऊंड, सिम्युलेशन रूम्स, फायरिंग रेंज आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ जवानांना मिळाला.
एकूण 700 आयआरबीएन रिक्रूट कॉन्स्टेबलमध्ये 131 महिला आणि 569 पुरुषांचा समावेश होता यांनी जवळजवळ एक वर्षाच्या कठोर, शिस्तबद्ध आणि कौशल्य-केंद्रित प्रशिक्षण घेऊन ते आता सेवेत रुजू होतील. यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांची नियुक्ती पोलिस ठाणे दिले जाईल.
काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नुकत्याच विधानसभा अधिवेशनात दिली होती. यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आसाममधून प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या प्रशिक्षित पोलिस कर्मचार्यांना तातडीने आवश्यक त्या पोलिस ठाण्यांत नियुक्ती दिली जाईल. ज्यामुळे पोलिस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे नव्याने रूजू होणार्या या जवानांना तातडीने पोलिस ठाणे मिळतील, अशी अपेक्षा आहे.