नाशिक : सातपूरच्या आयटीआय सिग्नल येथील एका बारमध्ये ५ क्टोबरला पहाटे अडीच वाजेच्या सुमारास केलेल्या गोळीबार प्रकरणी न्यायालयाने संशयित शुभम पाटील ऊर्फ भुरा, दुर्गेश वाघमारे, आकाश ऊर्फ अभिजित अडांगळे यांंना शुक्रवारपर्यंत (दि.१०) पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, लोंढे पिता-पुत्रांना देखील याचप्रकरणी रविवारपर्यंत (दि.१२) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बारमध्ये झालेल्या गोळीबारात वरुण विजय तिवारी (२३, रा. सिडको) याच्या पायाला गोळी लागली होती. मात्र, भीतीपोटी फिर्याद देण्यास कोणीही समोर येत नसल्याने सातपूर पोलिसांनी स्वत:हून फिर्याद दाखल केली आहे. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या फिर्यादीनुसार, भूषण प्रकाश लोंढे, शुभम पाटील उर्फ भुरा, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अडांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगेसह पाच अज्ञात संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्यापैकी गोळी झाडणारा शुभम याच्यासह दुर्गेश वाघमारे, आकाश ऊर्फ अभिजित अडांगळे यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक ऊर्फ नाना लोंढे यांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने, त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. या पिता-पुत्रांसह अन्य दोघांना गुरुवारी (दि.९) न्यायालयात हजर केले गेले असता, त्यांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटकेत असलेले सर्वच संशयित आरोपी रविवारपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.
सिडकोतील भाजप नगरसेवकाला इशारा
सिडकोतील भाजपच्या एका माजी नगरसेवकाला देखील पोलिसांनी सूचक इशारा दिल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून सध्या 'आॅपरेशन क्लिनअप' राबविले जात असून, राजकीय गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले जात आहे. त्यानुसार, राजकीय दहशत निर्माण करून गुन्हेगारांना बळ देणारे सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यानुसारच या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवकाला पोलिसांना इशारा दिल्याने, त्याचे धाबे दणाणले आहेत.