‘थर्मोन्यूक्लियर बॉम्ब’ ही काळाची गरज Pudhari File Photo
बहार

‘थर्मोन्यूक्लियर बॉम्ब’ ही काळाची गरज

पुढारी वृत्तसेवा

अनिल सहगल, स्क्वॅड्रन लीडर

अणुऊर्जा हे आजच्या काळातील सर्वात शक्तिशाली साधन. याच भीतीने भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष लवकर संपुष्टात आला, तर इराणच्या अणुऊर्जेची धास्ती खाऊन आखातातील रण पेटले. अखेर अमेरिकेला बंकर बस्टरचा वापर करावा लागला. शत्रूला कह्यात ठेवण्यासाठी अशी शक्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘थर्मोन्यूक्लियर बॉम्ब’ची भारतालाही गरज आहे.

जुलै 1945 हा मानवाच्या इतिहासातील दु:खद दिवस. याच दिवशी अमेरिकेने मानवी आणि मानवतेवर घाला घालत काळा इतिहास रचला. अमेरिकेने मॅनहंटन प्रोजेक्ट अंतर्गत न्यू मेक्सिको येथे जगातील सर्वात पहिली अणुचाचणी घेतली. या चाचणीचे नाव ट्रिनिटी टेस्ट असे ठेवले. या चाचणीनंतर 21 दिवसांनी 6 ऑगस्ट 1945 हा दिवस जगासाठी पुन्हा काळा दिवस ठरला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानवर जगातील सर्वात पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. दोन्ही देश एकमेकांविरोधात लढत होते. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला, तेव्हा या शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख होती, असे म्हणतात. यापैकी दीड लाख नागरिकांचा बॉम्ब पडताच जीव गेला. अशीच स्थिती नागासाकी शहराचीही झाली. अमेरिकेने तीन दिवसांनंतर 9 ऑगस्ट 1945 रोजी दुसरा अणुबॉम्ब टाकला. त्यावेळी नागासाकी शहराची लोकसंख्या सुमारे अडीच लाख होती. दोन्ही शहरांतील सर्व इमारती जमीनदोस्त झाल्या. या किरणोत्सर्गाचा प्रभाव तर पुढे पाच-सहा दशके राहिला आणि काही लोकांत तर आनुवंशिक दुष्परिणाम दिसून आला. झाडे वाळून गेली, जमीन नापीक झाली आणि पाणी विषाक्त झाले.

गेल्या आठ दशकांत विज्ञानाने असामान्य प्रगती केली. आज अमेरिकाव्यतिरिक्त अण्वस्त्र क्षमता असणार्‍या देशांत भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. याखेरीज चीन, फ्रान्स, ब्रिटन, इस्रायल, रशिया आणि उत्तर कोरियाकडेही अण्वस्त्र क्षमता आहे. अण्वस्त्र सज्जतेत सर्वाधिक चर्चा अणुबॉम्ब आणि हायड्रोजनची होते. 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेला अणुबॉम्ब होता आणि नव्याने तयार झालेला हायड्रोजन बॉम्ब, तर हजार पटीने अधिक विनाशकारी क्षमता बाळगतो. अणुबॉम्ब हा न्यूक्लियर फिक्शन (अणू विघटन) प्रक्रियेतून तयार होतो. या प्रक्रियेत युरेनियम-235 किंवा प्लुटोनियम-239 सारख्या महाकाय अणू केंद्रकाला (न्यूक्लियस) लहान लहान केंद्रकामध्ये विभाजित करण्यात येते. यानंतर प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या प्रक्रियेत न्यूट्रॉन साखळी प्रतिक्रिया देते आणि ती असामान्य रूपातून ऊर्जा निर्माण करते. हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब (लिटिल बॉय) हा सुमारे पंधरा किलो ‘टीएनटी’ समकक्ष होता. हायड्रोजन बॉम्ब तयार करताना अणू विभाजन आणि न्यूक्लियर फ्युजन या दोन्ही प्रक्रियांचा वापर केला जातो. त्याच्या निर्मितीत अणू न्यूक्लियस हे एकत्र येत मोठ्या संख्येने न्यूक्लियस तयार करतात आणि त्यामुळे ऊर्जा तयार होते; मात्र या ठिकाणी विभाजन सुरू होण्यासाठी एक लहान अणू स्फोटाची गरज भासते आणि तो स्फोट अधिक प्रमाणात तापमान अणि दाब निर्माण करतात.

1952 मध्ये अमेरिकेने पहिल्यांदा हायड्रोजन बॉम्ब ‘आयव्ही माईक’ची चाचणी केली. त्याची विनाशकारी शक्ती 10.4 टन ‘टीएनटी’एवढी दिसून आली. त्यानंतर रशियाने 50 टन क्षमतेचा ‘त्सार’ नावाचा बॉम्ब तयार केला. सुदैवाने कोणत्याही देशाने आतापर्यंत हायड्रोजन बॉम्बचा वापर केला नाही. अणुऊर्जा हे आजच्या काळात सर्वात शक्तिशाली साधन मानले जात असून त्याचा सकारात्मक वापर केला, तर मानवी जीवन सुखद आणि सुविधायुक्त होऊ शकते. अणुऊर्जेचा चांगल्या कामासाठी वापर केला, तर शत्रू देशांना त्याचे महत्त्व सांगणे सोयीचे राहू शकते. कदाचित अणुऊर्जेची जाणीव होताच शत्रू देश कारस्थानापासून दूर राहतील आणि कदाचित ते आपल्याकडे वाईट नजरेने पाहणार नाहीत; पण सध्या अशा प्रकारची शक्ती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला ‘थर्मोन्यूक्लियर बॉम्ब’ तयार करण्यास कोणत्याही प्रकारचे आढेवेढे घेऊ नयेत असे वाटते. आपल्याकडे अशा प्रकारची शस्त्रसज्जता असणे अनिवार्य आहे. अणुऊर्जेचे स्वरूप हे शत्रू देशांना धडकी भरवणारे आणि त्यांच्या मनात धाक निर्माण करणारे असावे. यानुसार तो कारस्थान करताना दहा वेळेस विचार करेल.

अलीकडेच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आणि त्यानुसार युद्ध क्षेत्रात नवीन पायंडा रचला. 6 आणि 7 मे 2025 रोजी रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. भारताच्या क्षेपणास्त्रांनी वादग्रस्त ठिकाणं नष्ट झाली. आपल्या राफेल विमानाने डागलेल्या ‘स्काल्प’ क्षेपणास्त्राचे सामर्थ्य शत्रू देशाला दिसले. त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देताना शेकडो ड्रोन एकाचवेळी भारताच्या 26 शहरांवर डागले; परंतु या सर्वांना भारताच्या सुरक्षा चक्राने नष्ट केले किंवा निष्प्रभ केले. हा नक्कीच नव्या भारताचा आक्रमक चेहरा होता. शेजारील देशाने नवी दिल्लीला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले; पण हवाई दलाने दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच हरियानाच्या सिरसा येथे पाडले. यानंतर भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या दहा हवाई तळांवर अचूक हल्ले केले आणि त्यामुळे पाकिस्तान नामोहरम झाला. भारताचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र सुपरसॉनिक असून ते आवाजापेक्षा तीन पट अधिक वेगाने हल्ला करण्यात सक्षम आहे. अर्थात, हे क्षेपणास्त्र 3,400 किलोमीटरच्या वेगाने 600 किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य सहजपणे भेदू शकते. त्याचा सर्वंकष वापर केला, तर तो 800 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतो. आज सुपरसॉनिकपेक्षा पुढे जात हायपरसुपरसॉनिकचा जमाना आहे. परिणामी, ब्राह्मोसची क्षमता वाढविली जात आहे आणि आवाजाच्या तुलनेत आठ पट वेगाने गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात यश आले, तर हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक श्रेणीत येईल. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगाच्या पाच पट अधिक वेगाने हल्ला करू शकतो. म्हणजेच सुमारे 6,174 किलोमीटर प्रतितास किंवा 1.7 किलोमीटर प्रतिसेकंद एवढ्या वेगाने लक्ष्यभेद करू शकतो. स्वनातित क्षेपणास्त्र अतिशय वेगवान, अत्याधुनिक आणि अचूक लक्ष्य टिपण्यात माहीर आहे. त्यांना पारंपरिक संरक्षण प्रणालीतून रोखणे अशक्य राहते.

यानिमित्ताने मला एक गोष्ट नमूद करणे औचित्याचे वाटते. भगवान श्रीराम हे श्रीलंकेला निघाले असता भारत आणि श्रीलंकादरम्यान असलेला समुद्र ओलांडणे कठीण होते. प्रचंड भरती असल्याने वानरसेनेला समुद्रपार घेऊन जाणे अवघड वाटत होते, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी समुद्र देवतेला प्रार्थना केली आणि काही काळ शांत राहण्याची विनंती केली. वानरसेनेला श्रीलंकेला नेण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. श्रीरामांनी तीन दिवस वाट पाहिली; परंतु समुद्रदेवता शांत झाली नाही. शेवटी श्रीरामांना धनुष्यबाण चालवावा लागला. बाण सोडताच समुद्र देवता श्रीरामास शरण आली आणि शांत झाली. शक्तिसामर्थ्य आणि कामगिरीचे हे अलौकिक उदाहरण असून त्याचे अनुकरण प्रत्येक युगात, काळात प्रत्येक स्वाभिमानी देशाने करणे गरजेचेच आहे. त्यामुळे भारताने थर्मोन्यूक्लियर बॉम्बची निर्मिती करायला हवी आणि त्याचवेळी अण्वस्त्रवाहू हायपरसॉनिक क्षेपणास्त्र देखील बनवायला हवे. तुलसीदास यांचे शब्द आजही लागू होतात.

‘विनय न मानत जलधि जड, गए तीनि दिन बीति

बोले राम सकोप तब, भय बिनु होई न प्रीति.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT