डॉ. जयदेवी पवार
बिहारमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत एनडीए विजयी झाली असली, तरी महागठबंधनपेक्षा त्यांचे मताधिक्य एक टक्केच जास्त होते. अशा स्थितीत जनसुराज पक्षामुळे मतविभाजन झाल्यास त्याचा फटका कुणाला बसणार, हे पाहावे लागेल. या पक्षाला 10-15 जागा मिळाल्या, तर प्रशांत किशोर त्यांची इच्छा नसली, तरी ‘किंगमेकर’ बनू शकतात.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची इंडिया आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः बिहारच्या सत्तेवर एकछत्री अमल निर्माण केलेल्या सुशासनबाबू नितीश कुमारांसाठी यंदाची निवडणूक अधिक महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर बिहारवर एकेकाळी हुकूमत गाजवणार्या लालूप्रसादांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांची वैयक्तिक प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणाला लागलेली आहे. अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महागठबंधनने पत्रकार परिषद घेत तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करणे टाळले होते; पण बिहारमध्ये हा पायंडा मोडत तेजस्वींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दशकांचा बिहारमधील राजकारणाचा इतिहास पाहिल्यास एनडीए आणि महागठबंधन यांच्यातील द्विध्रुवीय संघर्षामध्येच विधानसभा निवडणुका पार पडत असत; परंतु यंदा या संघर्षाला तिसरा कोन प्राप्त झाला असून, तो निर्णायक ठरण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत. हा कोन म्हणजे राजकीय रणनीतीकार म्हणून सबंध देशभरात ख्यातकिर्त झालेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा. या पक्षाने बिहारच्या रणसंग्रामात उडी घेतल्यामुळे काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकतर्फी वाटणारी ही लढाई आता अधिक औत्सुक्याची बनली आहे.
जनसुराज पक्षाची स्थापना नुकतीच दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी झाली असली, तरी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात त्यांनी बाजी मारली आहे. इतर राजकीय पक्ष अजूनही मित्रपक्षांमधील जागावाटपावर चर्चा करत असताना प्रशांत किशोर यांनी दि. 9 ऑक्टोबर रोजी 26 जिल्ह्यांतील 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विविध पक्षांना निवडणुकीच्या राजकारणाचे व्यवस्थापन करून विजयापर्यंत घेऊन जाण्याचा फॉर्म्युला सांगणार्या प्रशांत किशोर यांना बिहारच्या सामाजिक गुंतागुंतीची पूर्ण जाण आहे आणि आपल्या पहिल्या यादीतून त्यांनी आपले आकलन किती प्रगल्भ आहे, याचे दर्शनही घडवले आहे. या यादीमध्ये 17 अत्यंत मागासवर्गीय वर्ग (ईबीसी), 11 इतर मागासवर्गीय वर्ग, 7 मुस्लीम, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा आणि 9 सामान्य वर्गाचा समावेश आहे.
बिहार जात सर्वेक्षण 2023 नुसार या राज्यात ईबीसींचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि ओबीसींचे प्रमाण 27.12 टक्के आहे. त्यामुळे या दोन्ही वर्गांना सर्वाधिक उमेदवार प्रशांत किशोर यांनी दिले आहेत. तसेच 17.7 टक्के असलेल्या मुस्लिमांना 7 उमेदवार देण्यात आले आहेत. लोकसंख्येच्या 15.52 टक्के असलेल्या सामान्य वर्गाला 9 जागा देण्यात आल्या आहेत. महिला उमेदवारांची संख्या खूपच कमी आहे. तथापि, उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर झाल्यानंतर हे प्रमाण बदललेले असेल.
गतवर्षी जनसुराज पक्षाची स्थापना करणार्या प्रशांत किशोर ऊर्फ ‘पीके’ यांनी बिहारच्या राजकारणाचे व्याकरण बदलण्याची सुरुवात पूर्वीच केली आहे. पीके यांनी असा युक्तिवाद केला आहे की, काही हजार कुटुंबांनी बिहारच्या संपूर्ण राजकारणावर कब्जा केला आहे. एकतर ते राजकीय वंशावळीतील आहेत, माफिया (बाहुबली) आहेत किंवा फक्त एका राजकीय पक्षातून दुसर्या राजकीय पक्षात उड्या मारणारे आहेत किंवा प्रचंड भ्रष्ट, घोटाळेबाज आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप असणारे आहेत. सुशासनासाठी तिसरा पर्याय हवा असेल, तर या सर्वांपासून अलिप्त असणारा उमेदवार असायला हवा अशी मांडणी त्यांनी केली आणि त्यांचे जवळजवळ सर्व 51 उमेदवार त्या निकषांना पात्र ठरणारे आहेत. यामध्ये नवीन चेहरे, डॉक्टर, प्रामाणिक पोलिस अधिकारी, प्रामाणिक नोकरशहा, शिक्षणतज्ज्ञ, वकील, गायक, ट्रान्सजेंडर आणि व्यावसायिक आहेत. यापैकी कोणाचेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, कोणीही पक्ष बदलणारे नाही, कोणीही राजकीय घराण्यातील नाही. एकमेव अपवाद म्हणजे बिहारच्या माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची नात जागृती ठाकूर यांचा समावेश, ज्यांना जननायक (लोकांचा नायक) म्हणूनही ओळखले जाते.
प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून प्रभुत्व मिळवलेल्या जातीय गणितांपलीकडे जाण्याचा प्रयत्न करताहेत. प्रशासन, प्रामाणिकपणा आणि कामगिरी यांच्या आधारे मतदारांनी आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करायला हवी, यासाठी ते प्रबोधन करताहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी, 2015 मध्ये नितीश कुमार आणि अनेक स्थानिक नेत्यांसाठी विजयी अभियान रचलेल्या किशोर यांना आता आपला फॉर्म्युला स्वतःसाठी वापरायचा आहे. यासाठी त्यांनी 665 दिवसांत 2,600 किलोमीटरची पदयात्रा केली आहे. यादरम्यान त्यांनी 235 ब्लॉक्स आणि सुमारे 2,700 गावांना भेट दिली. या दौर्यातून बिहारमधील मतदारांना तिसरा पर्याय हवा आहे, असा दावा ते करताहेत. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. त्यांच्यावर घराणेशाहीचा किंवा भ्रष्टाचाराचा डाग नाही. ‘आपल्या मुलांच्या भविष्याकरिता मतदान करा’ असा नारा ते देताहेत.
बेरोजगारी, स्थलांतर आणि नितीश कुमार व लालूप्रसाद यांच्या वारशामुळे उद्भवलेल्या असंतोषात वाढलेल्या तरुण, महत्त्वाकांक्षी मतदारांमध्ये त्यांचे आवाहन प्रभावी ठरताना दिसत आहे. त्यांची प्रचार पद्धती वेगळी आहे. मोेठ्या रॅली किंवा सेलिब्रिटी समर्थनावर अवलंबून न राहता सूक्ष्म संवादावर लक्ष केंद्रित करण्यावर त्यांचा भर आहे. बिहारमधील अनेक मतदार नितीश कुमार यांच्या कोलांटउड्या आणि राजदच्या घराणेशाहीला कंटाळल्या आहेत. जनसुराज पक्ष त्यांच्यासाठी तिसरा आश्वासक पर्याय असल्याचे किशोर यांचे म्हणणे आहे.
किशोर यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि इतर भाजप नेत्यांविरुद्ध थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले असून यामुळे बिहारच्या राजकीय चर्चेत जोश निर्माण केला आहे. अर्थात, निवडणुका जिंकण्यासाठी केवळ प्रभावी मांडणी किंवा सर्वदूर असणारी ओळख पुरेशी नसते. पदयात्रेमुळे त्यांना सबंध बिहारमध्ये ओळख मिळाली; परंतु बूथ एजंट आणि कार्यकर्त्यांची फळी तसेच निवडणुका जिंकण्यासाठीचे नेटवर्क यामध्ये ते अद्याप पिछाडीवर आहेत. यामुळेच 2024 च्या पोटनिवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला प्रतिजागा 5,000 ते 37,000 मते मिळाली होती. शहरांतील शिक्षित तरुण किशोर यांच्या द़ृष्टिकोनाचे कौतुक करतात; पण ते मतांमध्ये परावर्तीत होणार का, हा खरा प्रश्न आहे. सर्वांत कळीचा प्रश्न आहे तो म्हणजे, जनसुराजचे उमेदवार उभे राहिल्याने कोणाच्या मतांचे प्रमाण कमी होणार? एनडीएच्या की महागठबंधनच्या? कारण, त्यावरच बिहारचा निकाल ठरणार आहे. प्रशांत किशोर यांच्या उमेदवारांनी 5 ते 7 टक्के मते घेतली, तरी अनेक संकिर्ण जागांमध्ये ही मते निकाल बदलू शकतात. भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवर लक्ष केंद्रित करून, त्यांनी एनडीएच्या विकासकथेला आव्हान दिले आहे. 35 वर्षांच्या भ्रष्ट द्विध्रुवीयतेचा मुद्दा मांडून त्यांनी नितीश आणि लालू यांच्या वारशाला टार्गेट केले आहे. यामुळे जनसुराज पक्षाच्या उमेदवारांमुळे एनडीएविरोधी मतांचे विभाजन होण्याच्या शक्यता अधिक दिसताहेत.
2020 च्या निवडणुकीत एनडीएने बिहारमध्ये सत्ता काबीज केली असली, तरी महागठबंधनपेक्षा रालोआला मिळालेली मते जेमतेम एक टक्क्यानेच जास्त होती. अशा संकीर्ण मैदानात जनसुराजकडे रालोआविरोधी मतांचा प्रवाह वळल्यास बिहार निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्यास प्रशांत किशोर बिहारचे ‘किंगमेकर’ बनू शकतात का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जनसुराजने 10 ते 15 जागा जिंकल्या, तर ते ‘किंगमेकर’ बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही; पण किशोर यांना स्वतःला ‘किंगमेकर’ बनायचे नाही. एक तर सत्तेत किंवा रस्त्यावर अशी त्यांची भूमिका आहे. सध्या किशोर यांची आक्रमकता दोन्ही गटांना वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करत आहे. एकीकडे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाच्या नैतिक वैधतेला त्यांनी तडाखा दिला आहे आणि भाजपच्या राज्य यंत्रणेला भ्रष्टाचार आणि अहंकारी म्हणून लक्ष्य केले आहे, तर दुसरीकडे उद्योजक, तरुण आणि सुधारणावादी राजकारणाच्या बाजूने असणार्या मध्यम मतदारांना खेचून राजदच्या पारंपरिक मतपेटीवर हात मारला आहे.