सध्या तरी इराण-इस्रायल युद्ध थांबले असले, तरी इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्त्रायलच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणार्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेला भेदून जागतिक महासत्तांना त्यांच्या सुरक्षेविषयी गंभीर इशारा दिला आहे. सध्या जगातील सर्व महासत्ता आपल्या संरक्षणासाठी बहुपर्यायी सुरक्षा यंत्रणा सज्ज करताहेत; पण एकाही देशाची हवाई सुरक्षा प्रणाली आज पूर्णतः अभेद्य नाही, हे स्पष्ट झाले आहे.
अमेरिका आणि इस्रायल हे परस्परांचे अत्यंत जवळचे सामरिक आणि राजनैतिक भागीदार आहेत. अमेरिकेची लष्करी ताकद ही जगातील सर्वाधिक व्यापक, तांत्रिकद़ृष्ट्या अत्याधुनिक आणि संघटित समजली जाते. हीच ताकद अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाचा, मुत्सद्देगिरीतील वर्चस्वाचा आणि भूराजकीय रणनीतींचा पाया आहे. तथापि, मध्यंतरीच्या संघर्ष काळात इराणने इस्रायलच्या लष्करी तळांवर आणि नागरी भागांवर अचूक हल्ले करून केवळ इस्रायललाच नव्हे, तर अमेरिकेच्या सुरक्षेलादेखील आव्हान दिले आहे. कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणच्या क्षेपणास्त्राने केलेला हल्ला हा स्पष्ट लष्करी संदेश होता. याशिवाय, अमेरिका आधीपासूनच उत्तर कोरियाच्या आक्रमक धोरणामुळे चिंतेत आहे. अमेरिका आणि इस्रायलसारखे सामरिक क्षेत्रातील दादा म्हणवणारे देशही अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपासून स्वतःचे संरक्षण करू शकत नसतील, तर भविष्यातील धोके आणखी वाढू शकतात, हे यातून स्पष्ट होते.
गेल्या शंभर वर्षांत अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या शर्यतीसोबत आक्रमकतेवर नियंत्रण आणण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी मुत्सद्देगिरीचे विविध प्रयोग झाले. 1962 चा क्युबा मिसाईल क्रायसिस हा अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या नेतृत्वातील शीतयुद्धाचा अत्यंत धोकादायक टप्पा होता. त्यावेळी जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहिले होते; मात्र योग्य वेळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांनी हा पेच सोडवला आणि संभाव्य तिसर्या महायुद्धाचा धोका टळला. त्यानंतर अमेरिका-रशिया संबंधांमध्ये संवाद, नियंत्रण आणि करारांची नवी दिशा निर्माण झाली; पण आज जग बहुध्रुवीय झाले आहे आणि अनेक देश आपली सैन्यशक्ती वाढवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत.
अमेरिका, इस्रायल, रशिया, चीन, युरोप आणि भारतसारख्या सैन्यशक्ती आपल्या सुरक्षेसाठी वायुदल संरक्षण प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. अमेरिकेकडे थाड (टर्मिनल हाय अल्टिट्युड एरिया डिफेन्स) प्रणाली असून ती अनेक मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी तैनात केली गेली आहे. ही प्रणाली मध्यम अंतराच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना त्यांच्या उड्डाणाच्या प्रारंभीच नष्ट करण्यास सक्षम आहे. यामध्ये हिट टू किल तंत्रज्ञान वापरले जाते. म्हणजे ही प्रणाली फक्त क्षेपणास्त्र अडवत नाही, तर त्याचा पूर्णतः नाश करते. अमेरिकेची पॅट्रियट प्रणाली क्रूज क्षेपणास्त्र आणि सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करते.
रशियाची एस-300 आणि एस-400 ही दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ती बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, विमान आणि क्रूज क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. रशिया आणि चीन यांच्यात सामरिक भागीदारी आहे. चीनची एच क्यू-9 सुरक्षा प्रणाली रशियन एस-300वर आधारित आहे. ती अनेक प्रकारच्या हवेतून येणार्या धोक्यांपासून संरक्षण करते. भारतीय सैन्यातील एस-400 प्रणालीस सुदर्शन चक्र म्हणून ओळखले जाते. आजघडीला ही प्रणाली जगातील सर्वोत्कृष्ट मानली जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांपासून भारताचा बचाव करताना या प्रणालीने आपली कार्यक्षमता दाखवून दिली होती.
अलीकडेच झालेल्या इस्रायल-इराण युद्धात इस्रायलच्या जगातील सर्वात प्रगत मानल्या जाणार्या हवाई संरक्षण प्रणालीची कठोर परीक्षा झाली. इस्रायलची हवाई सुरक्षा प्रणाली जगातील सर्वात अत्याधुनिक मानली जाते. यात विविध स्तर असून ते वेगवेगळ्या उंचीवरून आणि अंतरावरून येणार्या क्षेपणास्त्रांचा नाश करण्यासाठी ते डिझाईन केले आहेत. इस्रायलमध्ये आयर्न डोम प्रणाली रडारद्वारे येणार्या रॉकेटना शोधले जाते आणि त्याचा मागोवा घेतला जातो. या प्रणालीने हिजबुल्ला, हौथी आणि हमासच्या क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यांपासून हजारो वेळा यशस्वीपणे संरक्षण केले आहे; पण इराणच्या काही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी आयर्न डोम भेदून इस्रायलमधील काही महत्त्वाच्या इमारतींना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवले आहे. इराणने इस्रायलवर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून हल्ले केले.
आयर्न डोम हे ड्रोन, विमान व क्रूज क्षेपणास्त्र यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, तर एरो-2 व एरो-3 ही प्रणाली दीर्घ पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यासाठी आहे. इराणने एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र वापरून इस्रायलच्या अभेद्य मानल्या जाणार्या या दोन्ही संरक्षण कवचांना भला मोठा छेद दिला. या हल्ल्यातून कोणतीही सुरक्षा प्रणाली शंभर टक्के सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही, असा इशारा इराणने जगाला दिला.
दरम्यान, तुर्कियेची स्टील डोम बहुपर्यायी हवाई सुरक्षा प्रणालीही चर्चेत आहे. ही प्रणाली नेटवर्कवर आधारित असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने तुर्कियेच्या आकाशाचा मोठा भाग संरक्षित करेल. यामध्ये चार स्तर असतील, जे अत्यल्प अंतर, लघुपल्ला, मध्यम पल्ला आणि दीर्घ पल्ल्यावरून होणार्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देतील; मात्र याची खरी परीक्षा युद्धस्थितीतच होणार असल्याने सध्या त्याच्या क्षमतेविषयी निश्चित सांगता येत नाही.
यातील सर्वात मोठा धोका म्हणजे, हायपरसोनिक क्षेपणास्त्रे. या क्षेपणास्त्रांपासून बचाव करणारे कोणतेही प्रभावी संरक्षण कवच आजमितीला अस्तित्वात नाही. क्रूज क्षेपणास्त्र जमिनीच्या अगदी जवळ उडून लहान अंतरावर मारा करते, तर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वायुमंडळाबाहेर जाऊन हजारो किलोमीटरवर लक्ष्य भेदू शकतात. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शोधण्यासाठी अमेरिका व रशियाने अवकाशात इन्फ्रारेड सेन्सरयुक्त उपग्रह यंत्रणा उभारली आहे. उष्णता व प्रकाशामुळे इन्फ्रारेड प्रणाली त्याचा मार्ग शोधू शकते. हे क्षेपणास्त्र जमिनीवर येतानाही रडारवर सापडते; मात्र हायपरसोनिक क्षेपणास्त्र शोधणे अत्यंत कठीण आहे.
हायपरसोनिक शस्त्रे जलद, कमी उंचीवर उडणारी आणि अत्यंत गतिमान असतात. ही शस्त्रास्त्रे अशा शिताफीने डिझाईन केलेली असतात की, पारंपरिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली त्यांचा वेळीच शोध घेऊ शकत नाही. हायपरसोनिक क्षेपणास्त्र मॅक-5 (आवाजाच्या वेगाच्या पाचपट) गतीने उडतात. चीनने 2021 मध्ये दोन संभाव्य हायपरसोनिक शस्त्रांची चाचणी घेतली होती. यामध्ये अण्वस्त्र वाहून नेणारे आणि पृथ्वीची परिक्रमा करून लक्ष्य भेदणारे शस्त्र समाविष्ट होते.
एखाद्या देशाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राने दुसर्या देशावर हल्ला केला, तर ते अँटिडिफेन्स प्रणालीने थोपवणे जवळपास अशक्य आहे. कारण, हे क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर दिशानिर्देश बदलू शकते आणि रडारला चकवा देते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 2019 मध्ये जगाला सांगितले होते की, रशियाचे अवांगार्ड हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्याही वर्तमान किंवा भविष्यातील संरक्षण प्रणालीला मात देऊ शकते. अण्वस्त्रांनी सज्ज ही क्षेपणास्त्रे आवाजाच्या वेगाच्या 20 पट गतीने उडू शकतात. चीनने अशी हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी केली आहे, जी पृथ्वीची परिक्रमा करून लक्ष्य भेदते. त्यामुळे अमेरिकादेखील चीनच्या टप्प्यात आली आहे. भारत व उत्तर कोरियानेदेखील याच तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश मिळवले आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे भविष्यातील युद्धांची दिशा ठरवतील. त्यांच्या वेग व मारक क्षमतेमुळे जगभरातील महासत्ता या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उतरल्या आहेत.
दुसर्या बाजूला हवाई सुरक्षा प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक देश मिसाईल डिफेन्स यंत्रणेत अब्जावधी डॉलर्सचा गुंतवणूक करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स यंत्रणेच्या डिझाईनची निवड केली आहे, जी त्यांच्या मते भविष्यातील सुरक्षा कवच ठरेल. ट्रम्प यांनी म्हटले होते की, हे तंत्रज्ञान अमेरिकेला पुढील पिढीच्या हवाई धोक्यांपासून वाचवेल. अमेरिका या गोल्डन डोम प्रणालीवर तब्बल 175 अब्ज डॉलर्स खर्च करत आहे. ही नवी यंत्रणा जमिनीवर, समुद्रावर आणि अंतराळात नवनवीन तंत्रज्ञान वापरून सज्ज केली जात आहे. या यंत्रणेमुळे अंतराळात असलेल्या सेन्सर व इंटरसेप्टरद्वारे हवाई हल्ल्यांचे धोके रोखता येतील. हवाई सुरक्षा प्रणाली केवळ देशाच्या संरक्षणासाठी नव्हे, तर युद्धाच्या स्थितीत सामरिक वर्चस्व मिळवण्यासाठीही महत्त्वाची असते. सध्या जगातील सर्व महासत्तांचा प्रयत्न आपल्या संरक्षणासाठी बहुपर्यायी सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यावर आहे. याच वर्षी मे महिन्यात अमेरिकेने सौदी अरेबियासोबत 142 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार केला आहे, जो इतिहासातील सर्वात मोठ्या संरक्षण करारांपैकी एक मानला जातो.
असे असले, तरी सुरक्षा परिषदेमधील पाच कायम सदस्य देश आणि अण्वस्त्रधारी महासत्ता म्हणजे अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे त्यांची हवाई सुरक्षा प्रणाली पूर्णतः अभेद्य आहे, असे छातीठोकपणाने सांगू शकत नाहीत. खरं तर, सध्या तरी इराण-इस्रायल युद्ध थांबले असले, तरी इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणार्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेमध्ये छेद घालून जागतिक महासत्तांना त्यांच्या सुरक्षेविषयी गंभीर इशारा दिला आहे. इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेचा कमकुवतपणा अमेरिकेसारख्या लष्करी महासत्तेसाठीही चिंतेचा विषय बनला आहे.