Ancient Rock Art | रहस्य कातळशिल्पांचे 
बहार

Ancient Rock Art | रहस्य कातळशिल्पांचे

पुढारी वृत्तसेवा

कावेरी गिरी

सध्या गाजलेल्या एका चित्रपटाच्या निमित्ताने कोकणातील कातळशिल्पांची चर्चा बरीच सुरू आहे. काय आहेत ही कातळशिल्पे, कशी आहेत, त्याची निर्मिती कशी झाली, त्यांचा अर्थ काय, यासंदर्भात थोडक्यात घेतलेला आढावा...

कातळशिल्पे म्हणजे जांभा किंवा इतर खडकांवर कोरलेली चित्रे आणि आकृत्या, जी हजारो वर्षांपूर्वीच्या आदीमानवाने आपल्या जीवनातील प्रसंग, प्राणी आणि निसर्गाचे चित्रण करण्यासाठी कोरली होती. कोकणातील कातळशिल्पे ही जांभ्या दगडांवर कोरलेली हजारो वर्षांपूर्वीची प्राचीन मानवी आणि प्राण्यांची चित्रे आहेत, जी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सड्यांवर आढळतात. या शिल्पांमध्ये हत्ती, गेंडा, वाघ, शार्क, मानवाकृती आणि भौमितिक आकृत्यांचा समावेश आहे. हे ‘पेट्रोग्लिफ्स’ (Petroglyphs) हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानव जीवनाची, निसर्गाची आणि संस्कृतीची महत्त्वाची माहिती देतात, ज्यामुळे या स्थळांना जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, कोकणातील कातळशिल्पे 1990 पासून उजेडात येत गेली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील याची संख्या अडीच हजारांहून अधिक झाली आहे. प्रमुख ठिकाणे म्हणजे राजापूर तालुक्यातील रत्नागिरीजवळील कासव बुद्रुक, देविहसोळ, रुंधेतळी, देवाचे गोठणे, बारसू, जांभरूण, कुडोशी, तळेरे, उक्षी, कशेळी, निवळी, चवे देऊड ही गावे. सोबतच सिंधुदुर्ग जिल्हा ‘कातळशिल्प समृद्धीचा ठेवा’ आहे. सिंधुदुर्गमधील मालवण, देवगडमध्ये अठरा कातळशिल्पे मिळाल्याची नोंद आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील खोटले, रामगड, कुडोपी, असरोंडी, मसुरे, कांदळगाव, तर देवगडमधील आरे, कुणकेश्वर, साळशी, वानिवडे, तळेबाजार, बापार्डे, दाभोळे, कुडोपी येथे कातळशिल्पे आढळली आहेत.

कोकणातील काही कातळशिल्पे अश्मयुगीन , तर काही मध्याश्मयुगीन काळातील आहेत. या शिल्पांचा काळ मेसोलिथिक (Mesolithic) ते प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडापर्यंतचा असू शकतो. काहीवेळा ही हजारो वर्षे जुनी असावीत, असा अंदाज आहे. अनेक रहस्यमयी कातळशिल्पे आहेत, ज्याची आपण कल्पनादेखील करू शकणार नाही. कोकणातील विस्तीर्ण पठारांवर, तेथील जांभा दगडांवर आढळणारी चित्रे अगदी सजीव भासतात. काहींमध्ये नृत्य करणारे मानव, काहींमध्ये प्राण्यांची शिकार करतानाचे द़ृश्य, तर काहींमध्ये प्राचीन धार्मिक प्रतीकात्मक आकृती दिसतात. ही चिन्हे पाहून त्याकाळी मानव शिकार करून जगत होता का, शेती होत नसेल का, असे प्रश्न येथे उपस्थित होत आहेत.

उदाहरणासाठी सांगायचे, तर देवीहसोळ येथे आर्यादुर्गादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्यासमोरच एक कातळशिल्प आहे, ज्यामध्ये कोरीवकाम केलेले दिसते. बारसूमध्ये एका पठारावर जागोजागी काही शिल्पे विखुरलेली दिसतात. त्यात वाघ, मासे, स्वसंरक्षण करणारा मानव, हत्ती, समुद्री जलचर यांच्या आकृत्या आहेत. देवाचे गोठणे हे तर चमत्कारिकच आहे. एका विस्तीर्ण पठारावर दोन मानवाच्या आकृत्या दिसतात. त्यातील एका मानवाच्या आकृतीवर होकायंत्र ठेवल्यास ते दिशाहीन दिसते. म्हणजेच हे होकायंत्र उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम दिशा स्थिरपणे दाखवत नाही, तर यंत्राची सुई जलद गतीने गोल-गोल फिरताना दिसते. इतर अन्य कोणत्याही ठिकाणी हे अद्भुत आणि रहस्यमय घटना घडताना दिसून येत नाही. त्या काळात धातूची साधने नसल्याने ही चित्रे कठीण दगडावर दुसर्‍या दगडाने ठोकत-ठोकत तयार केली गेली. ‘पिकिंग टेक्निक’ म्हणून ही पद्धत ओळखली जाते. कोरलेली आकृती काही ठिकाणी पृष्ठभागावरून काही मिलिमीटर खोल गेल्यामुळे आजही स्पष्टपणे दिसते. ऊन, वारा, पाऊस सहन करत आजही ही शिल्पे मानवी उत्क्रांतीची साक्ष देतात. इतकचं नाही, तर काही कातळशिल्पांची आजही पूजा होते. निसर्गाचा एक भाग म्हणून कोकणातील जंगले आणि कातळशिल्पांचं संवर्धन, परंपरेचे जतन आज महत्त्वाचा विषय ठरत आहे.

जसे दशावतार, गणेशोत्सव तसे कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन कोकणातल्या संस्कृतीमध्ये कालांतराने समाविष्ट होईल, असे म्हणायला हरकत नाही. कातळशिल्पांचे महत्त्व ऐतिहासिक आणि धार्मिकदेखील आहे. कारण, काही गूढ शिल्पे उलगडण्याचा प्रयत्न, त्याचा अभ्यास आणि संशोधन आजदेखील होत आहे. या शिल्पनांमधील चित्रे काय व्यक्त करतात, याचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे, हीच या शिल्पांची मुख्य रहस्यमय बाब आहे. शिल्पे हजारो वर्षांपूर्वीची आहेत; पण त्यांचा नेमका कालावधी आणि का कोरली गेली, याविषयी सखोल माहिती उपलब्ध नाही. ही शिल्पे केवळ कलाकृती आहेत की, त्यांचा काही विशिष्ट सांस्कृतिक, धार्मिक किंवा सामाजिक उद्देश होता, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ही शिल्पे प्रागैतिहासिक काळातील मानवी संस्कृती समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहेत. जगभरात रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स स्टडीजचा अभ्यास सध्या सुरू आहे, जेणेकरून सापडलेल्या कातळशिल्पांवर संशोधन होऊन नवा इतिहास, रहस्यांची उकल होईल.

कोकणात ही प्राचीन शिल्पे जतन करण्याची अत्यंत गरज आहे. कारण, अनेकदा मानवी हस्तक्षेपामुळे ती नष्ट होत असल्याचे दिसते. प्रत्येक संशोधक, प्रत्येक पर्यटक, प्रत्येक वाटसरूने या कातळशिल्पांना भेट द्यावीच, अशी ही खोदचित्रे आहेत. कोकणातील कातळशिल्पे म्हणजे केवळ दगडांवरील आकृत्या नाहीत, तर ती आपली ओळख सांगणारी अमूल्य सांस्कृतिक वारसा आहेत. काळाच्या ओघात ही शिल्पे नष्ट होऊ नयेत म्हणून स्थानिक लोक, शासन आणि पर्यटकांनी त्यांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. ही शिल्पे मानवी जीवनाचा, निसर्गाचा, प्राण्यांच्या प्रजातींचा आणि तत्कालीन पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी मौल्यवान पुरावे आहेत. कारण, काही शिल्पे घनदाट जंगलात अस्तित्वात आहेत, जणू ही खोदचित्र या जंगलांचे रक्षण करताहेत. आता कोकण भ्रमंती केल्याशिवाय हा समृद्ध अनुभव तुम्हास घेता येणार नाही बरे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT