ममतादीदींचे ‘मंदिर कार्ड’ 
बहार

ममतादीदींचे ‘मंदिर कार्ड’

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये जगन्नाथ पुरीसारखे मंदिर उभारून भाजपच्या हिंदुत्वाला आव्हान

पुढारी वृत्तसेवा
सरोजिनी घोष, कोलकाता

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांची तयारी एव्हाना सुरू झालेली आहे. यादरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये जगन्नाथ पुरीसारखे मंदिर उभारून भाजपच्या हिंदुत्वाला एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपेतर विरोधी पक्षांच्या एव्हाना लक्षात आले आहे की, मोदींचे भारतीय जनमानसातील गारुड बाजूला सारून आपले स्थान निर्माण करायचे असेल, तर हिंदुत्वावर टीका करण्याचा मार्ग सोयीचा ठरणारा नाही. विकासाच्या, सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्या-मरण्याशी संबंधित प्रश्नांबाबत टोकाची विरोधी भूमिका घेतली, तर एक वेळ जनसामान्यांतून त्याला पाठिंबा मिळू शकतो; पण हिंदुत्वाच्या भूमिकेला विरोध करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे आहे.

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत असताना सत्ताधारी ममता बॅनर्जी चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत, तर भाजप त्यांचा पायउतार करण्यासाठी सज्ज होत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये जगन्नाथ पुरीसारखे मंदिर उभारून एक नवे कार्ड खेळले आहे. या माध्यमातून भाजपच्या हिंदुत्वाला एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. या मंदिरामागे कोणतेही राजकारण नसल्याचे ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस सांगत असले, तरी त्यांची आतापर्यंतची भूमिका पाहता या म्हणण्यात तथ्य नसल्याचे दिसून येते.

ओडिशाच्या पुरीच्या धर्तीवर मेदिनीपूरच्या दीघा येथे साकारलेले हे भव्य जगन्नाथ मंदिर ममतादीदींच्या आतापर्यंतच्या धर्मनिरपेक्षतावादी किंवा सेक्युलर इमेजशी पूर्णतः विसंगत म्हणावे लागेल. सुमारे 250 कोटी रुपये खर्च आलेल्या या मंदिराचे अनावरण अक्षय तृतियेच्या दिवशी 30 एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी ममता बॅनर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती. ममता बॅनर्जी यांनी मंदिराचे छायाचित्र त्यांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत हँडलवरून शेअर केले. त्यांनी मंदिराचे अनावरण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले आहे. ‘दीघा येथे जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात विराजमान असलेले भगवान जगन्नाथ यांचे पहिले दर्शन माझ्या हृदयावर कोरले गेले आहे. मूर्तीचे तेजस्वी रूप मनाला ताजेतवाने करणारे आहे. मला आरती करण्याबरोबरच माँ, माटी, मनुष यांच्यासाठी ब्रह्मांडाचे नायक असलेल्या भगवानाचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

या मंदिराची योजना 2019 मध्ये ममतादीदींनीच तयार केली होती, तेव्हा त्याचा खर्च अंदाजित 143 कोटी रुपये होता. कोरोना काळामुळे मंदिराच्या कामाला उशीर झाला आणि 2023 मध्ये त्याचे काम पुन्हा सुरू झाले. 22 एकर जमिनीवर उभारलेल्या या मंदिरावर आतापर्यंत सुमारे 250 कोटी रुपये खर्च झाला आहे. हा संपूर्ण खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. मंदिराच्या कामासाठी राजस्थानचा लाल दगड म्हणजे सँडस्टोनचा वापर, तर मंदिराच्या फरशीसाठी व्हिएतनामहून आयात केलेल्या मार्बलचा वापर करण्यात आला आहे. कलिंग स्थापत्य शैलीत तयार केलेल्या या मंदिराच्या कळसाची उंची 65 मीटर आहे. मंदिरासाठी दोन हजारांहून अधिक कारागिरांनी सलग दोन वर्षे काम केले. यातील 800 कारागीर राजस्थानचे आहेत. मंदिराची निर्मिती पश्चिम बंगाल हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने केली. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विश्वस्त मंडळ नेमले आहे. यात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांव्यतिरिक्त इस्कॉन, सनातन ट्रस्ट आणि स्थानिक पुजार्‍यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. मंदिरात उभारलेल्या तीन मंडपांची क्षमता अनुक्रमे दोन, चार अणि सहा हजार भाविकांना सामावणारी आहे. तेथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्याची सुविधाही आहे. मंदिर परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळा अणि आराम करण्याचेही ठिकाण असून अग्निशमन दल अणि पोलीस चौकीदेखील उभारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT