बंकर बस्टर्सकडे भारताची वाटचाल Pudhari File Photo
बहार

बंकर बस्टर्सकडे भारताची वाटचाल

पारंपरिक युद्धाला छेद देणारे बंकर बस्टर्स

पुढारी वृत्तसेवा

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

पारंपरिक युद्धाला छेद देणारे बंकर बस्टर्स. शत्रू राष्ट्राने जमिनीत खोल लपवलेली लष्करी संरचना आणि क्षेपणास्त्रे नष्ट करून शत्रूला नामोहरम करायचं तर त्याला पर्याय नाही. इराणवर आगळीक करताना अमेरिकेने याच अस्त्राचा आधार घेतला. पाकिस्तान-चीनसारखे तगडे व विश्वासघातकी शेजारी असतील, तर भारतासमोरही हा मार्ग अवंलबण्याशिवाय पर्याय नाही.

आजच्या युगात युद्धाचे स्वरूप पारंपरिक रणांगणावर लढल्या जाणार्‍या लढायांपुरते मर्यादित राहिलेले नाही. शत्रूला विविध पातळ्यांवर धक्के देऊन युद्धामध्ये बाजी मारण्यासाठी नवनवीन आणि अपारंपरिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. विशेषतः भारताच्या द़ृष्टीने विचार केल्यास चीन आणि पाकिस्तानचा सामना करताना अनेक नवनवीन युद्ध पद्धतींचा अवलंब करणे अपरिहार्य बनले आहे. यामध्ये सध्या चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे जमिनीखाली असणार्‍या शत्रूच्या अत्याधुनिक संरक्षणात्मक पायाभूत सुविधा. सामान्यतः शक्तिशाली बॉम्ब, दीर्घ पल्ल्याची विनाशकारी क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे यांसारखी शस्त्रास्त्रे ठेवण्यासाठी भूगर्भात खोलवर अभेद्य कवच निर्माण केले जाते. अशा प्रकारच्या संरचना बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करणे कठीण ठरते. यासाठी बंकर बस्टर क्षेपणास्त्रांची आवश्यकता प्रकर्षाने जाणवते.

बंकर बस्टर हे विशेष प्रकारचे क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब असतात, जे अत्यंत मजबूत संरचना असलेल्या आणि जमिनीखाली खोलवर असलेल्या लक्ष्यांवर अचूक प्रहार करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे शत्रूच्या भूमिगत कमांड सेंटर्स, क्षेपणास्त्र साईलोज (आंतरखंडीय क्षेपणास्त्रांसारख्या प्रचंड शक्तिशाली क्षेपणास्त्रांच्या साठवणूक आणि प्रक्षेपणासाठी वापरली जाणारी संरचना) अण्वस्त्र साठवणूक केंद्रे, प्रयोगशाळा आणि तांत्रिक पायाभूत सुविधांना नष्ट करणे हा असतो.

बंकर बस्टर क्षेपणास्त्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची खोल घुसखोरीची क्षमता. ही क्षेपणास्त्रे भूगर्भामध्ये सुमारे 80 ते 100 मीटर खोलवर जाऊन मगच स्फोट घडवतात. त्यासाठी यामध्ये डिले फ्यूज यंत्रणा वापरली जाते. यामुळे वेळेच्या विशिष्ट नियोजनानुसार जमिनीखाली आत खोलवर जाऊनच स्फोट घडतो. आज भारताचा संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक आणि तांत्रिक विकास नव्या उंचीवर पोहोचत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून भारत बंकर बस्टर क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा उद्देश शत्रूचे भूमिगत बंकर, कमांड सेंटर्स, मिसाईल साईलोज आणि आण्विक साठवणूक केंद्रे नष्ट करणे हाच आहे. ही नवीन श्रेणी ‘अग्नी-5’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या सुधारित रूपावर आधारित आहे; मात्र या आवृत्तीत आण्विक शस्त्राऐवजी सुमारे 7500 किलो वजनाचा प्रचंड पारंपरिक स्फोटक वारहेड वापरण्यात येणार आहे. या शक्तिपूर्ण आवृत्तीचा पल्ला सुमारे 2500 कि.मी. असणार आहे. तिचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भूमिगत लक्ष्य भेदण्याची क्षमता.

अमेरिकेचा जीबीयू 57-मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर (एमओपी) हा सध्या जगातील सर्वात प्रचंड आणि प्रभावी बंकर बस्टर मानला जातो. याच शस्त्राचा वापर नुकताच अमेरिकेने इराणच्या फोर्डो आण्विक केंद्रावर केला होता. पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, हा एमओपी फोर्डोमधील आण्विक केंद्राविषयीची तब्बल 15 वर्षे गुप्तचर माहिती घेऊन त्यानुसार विकसित करण्यात आला होता. भारताचे नवे शस्त्र अमेरिका किंवा रशियाच्या बंकर बस्टर बॉम्बपेक्षा वेगळ्या संकल्पनेवर आधारले आहे. अमेरिकेप्रमाणे प्रचंड बॉम्बवर्षक विमानांऐवजी भारत मिसाईलवर आधारित प्रणाली वापरत आहे. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे खर्चामध्ये होणारी कपात. तसेच यामुळे प्रत्यक्ष तैनातीमध्ये अधिक लवचिकता व सुरक्षितता प्राप्त होणार आहे. या नव्या शस्त्रामध्ये 7500 किलो वजनाचे पारंपरिक स्फोटक वाहून नेण्याची क्षमता असेल. 2500 कि.मी.पर्यंतचे कार्यक्षेत्र लक्षात घेता ते चीन आणि पाकिस्तानमधील सामरिक केंद्रांपर्यंत सहज पोहोचणारे असेल. 80 ते 100 मीटर खोल जमिनीत घुसून स्फोट घडवण्याची क्षमता शत्रूच्या सर्वात गुप्त व सुरक्षित बंकरला धक्का देईल. मॅक 8 ते मॅक 20 दरम्यानच्या हायपरसॉनिक वेगाने प्रवास करण्याची क्षमता काही क्षणात आपले उद्दिष्ट सफल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या वेगामुळे त्यांना जगातील सर्वात प्रगत जागतिक शस्त्र प्रणालींच्या बरोबरीचे स्थान मिळेल, असे इंडिया टुडेच्या अहवालात म्हटले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अग्नी-5 या श्रेणीतील नव्या दोन प्रकारांत एक पृष्ठभागावरील लक्ष्यांना हवेतच स्फोट घडवणारा आणि दुसरा जमिनीत खोल घुसणारा असणार आहे. वास्तविक, भारताने आजवर आपल्या क्षेपणास्त्र विकासात प्रामुख्याने आण्विक प्रतिरोधनावर भर दिला होता; पण सध्या बदलत चाललेल्या वातावरणामध्ये आधुनिक शस्त्रांचाही वापर करून शत्रूच्या संरचनात्मक सामर्थ्यावर हल्ला चढवणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. विशेषतः चीनने तिबेट आणि सिंक्यांगमध्ये तसेच पाकिस्तानने बलुचिस्तानात ज्या प्रकारे अनेक गुप्त आणि मजबूत सैन्य केंद्रे भूमिगत उभारल्याचे सांगितले जाते, त्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हे बंकर बस्टर क्षेपणास्त्र म्हणजे सामरिक सज्जतेला नवी बळकटी देणारे अस्त्र ठरेल. अशा बंकर बस्टरमुळे शत्रूला आपल्या संरक्षक बंकर रचनांबाबत पुनर्विचार करावा लागेल. दुसरे म्हणजे, प्रगत राष्ट्रांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांंचा वेध घेऊन ती आपल्या संकल्पनेनुसार स्वदेशी पद्धतीने बनवत आहे, ही बाब विशेष महत्त्वाची ठरते. अशा प्रकारच्या मिसाईल प्रणालीमुळे भारताच्या ‘मिनिमम डेटरन्स’ धोरणातही बदल होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात, बंकर बस्टर क्षेपणास्त्र प्रकल्पामुळे देशाच्या सामरिक क्षमतेत एक नवा अध्याय सुरू होतो आहे. अमेरिकेप्रमाणे विमानांवर अवलंबून न राहता भारताने मिसाईल आधारित बंकर बस्टर प्रणाली विकसित करणं, हे एक दूरद़ृष्टीचं पाऊल आहे. यामुळे भारताची स्वतःची शस्त्रनिर्मिती क्षमता, तांत्रिक आत्मनिर्भरता आणि रणनीतिक स्वातंत्र्य याची नवी झलक जगाला दिसून येईल.

पाकिस्तानमधील किराना हिल्स हे ठिकाण अण्वस्त्र साठवणुकीसाठी वापरलं जात असल्याची चर्चा सातत्याने होते. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सोशल मीडियावर भारताने या परिसरावर हल्ला केल्याची अफवा पसरली होती. ती अधिकृतरीत्या नाकारण्यात आली, तरीही अशा घटनांनी स्पष्ट केलं की, भारताच्या शत्रू राष्ट्रांकडे खोलवर लपवलेली सामरिक संरचना आहे आणि त्यांना लक्ष्य करायचं असेल, तर भारताला स्वयंपूर्ण, स्वदेशी आणि अचूक बंकर बस्टर क्षेपणास्त्राची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा क्षेपणास्त्रांचे अस्तित्व हे स्ट्रॅटेजिक सिग्नलिंगसाठी वापरले जाते. अशी प्रणाली यशस्वीरीत्या विकसित केल्यास भारताची सामरिक भांडारशक्ती केवळ संरक्षणापुरती मर्यादित नाही, तर ऑफेन्सिव्ह डिफेन्ससाठीही सज्ज आहे, हा संदेश जगाला दिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT