अफेशिया म्हणजे काय? Pudhari File Photo
आरोग्य

Aphasia | अफेशिया म्हणजे काय?

अफेशियाची कारणे, लक्षणे आणि उपचार

पुढारी वृत्तसेवा
डॉ. संतोष काळे

अफेशिया हा एक न्यूरोलॉजिकल (मेंदूशी संबंधित) विकार आहे. यामध्ये व्यक्तीला बोलणे, ऐकून समजून घेणे, वाचन करणे आणि लेखन करण्यामध्ये अडचण येणे अशा प्रकारच्या समस्या जाणवतात.

अफेशिया हा विकार प्रामुख्याने मेंदूत झालेल्या इजा, स्ट्रोक (मेंदूतील रक्तपुरवठा खंडित होणे), अपघात, ट्युमर किंवा स्नायूंच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे होतो.

अफेशियाची मुख्य कारणे :

1. स्ट्रोक (पक्षाघात) हे अफेशियाचे सर्वात सामान्य कारण आहे.

2. अपघातामुळे किंवा धक्का बसल्यामुळे मेंदूत इजा होणे.

3. मेंदूत ट्युमर किंवा संसर्ग होणे.

4. अल्झायमर, डिमेन्शिया इत्यादी न्यूरोलॉजिकल विकार

अफेशियाचे प्रकार :

1. ब्रोकाज अफेशिया : यामध्ये रुग्णाला शब्द आठवण्यात आणि बोलण्यात त्रास होतो.

वाक्य अपूर्ण, तुटक-तुटक असतात.

समोरचं बोलणं बर्‍यापैकी समजतं.

2. वर्निकस् अफेशिया

अशा व्यक्तीला सहज बोलता येतं; पण बोलण्यात अर्थ नसतो.

समोरचं बोलणं समजत नाही.

वाक्ये विस्कळीत आणि गोंधळात टाकणारी असतात.

3. ग्लोबल अफेशिया

हे सर्वात गंभीर स्वरूप आहे. अशा रुग्णाला ना बोलता येतं, ना समजून घेता येतं, ना वाचता किंवा लिहिता येतं.

* अफेशियाची लक्षणे :

योग्य शब्द आठवता न येणे

अपूर्ण वाक्य किंवा चुकीची शब्दयोजना

समोरचं बोलणं समजण्यात अडचण

लिहिताना चुकीचे शब्द वापरणे,

वाचन करताना अडथळा येणे

उपचार :

स्पीच थेरपी : या उपचारात रुग्णाला हळूहळू शब्द, वाक्य आणि संभाषण शिकवलं जातं.

कौटुंबिक पाठिंबा : कुटुंबीयांनी निराश न होता रुग्णासाठी प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक आहे. घरच्या लोकांनी सोप्या भाषेत रोज संवाद साधावा.

औषधोपचार : काही वेळा मेंदूतील सूज किंवा इतर विकारांवर औषधे दिली जातात.

एकूणच, अफेशिया हा केवळ भाषा बोलण्याचा त्रास नसून, व्यक्तीच्या सामाजिक, मानसिक आणि भावनिक आयुष्यावर खोल परिणाम करणारा विकार आहे. लवकर निदान आणि नियमित उपचार यांच्या साहाय्याने व्यक्ती पुन्हा पूर्वपदावर येऊ शकते. सहकार्य, संयम आणि सकारात्मक द़ृष्टिकोन हेच याचे खरे औषध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT