दै. ‘पुढारी’साठी वैकुंठनायक पांडुरंगाच्या वैकुंठीचा उंबरठा आषाढी वारी लेखमाला लिहायला ज्या दिवशी हातात घेतली, त्याच दिवशी दुसर्या बाजूला एक विलक्षण बातमी झळकली. बातमी अशी होती, कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या काठावर रात्रीच्या भयान काळोखात एक मांत्रिक एका स्त्रीच्या अंगात आलेलं ‘लागीरं’ काढण्यासाठी लिंबू, गंडे, दोरे, सुई, बिब्बा यांचा प्रयोग करीत होता. बाई घुमत होती. मांत्रिक झाडाला सोड म्हणून ओरडत होता. बातमी वाचून आणि व्हायरल झालेला ‘व्हिडीओ’ पाहून मन सुन्न झाले. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नव विचाराने भारावलेल्या कोल्हापूर महानगराची जर ही अवस्था असेल तर ऐंशी टक्के खेड्या-पाड्यांची काय अवस्था असेल?
या घटनेसंदर्भात पंढरीच्या वारीची तुलना करू लागलो तेव्हा मनाला एक आशदायक दिलासा मिळाला. आपल्या डोळस श्रद्धाजलाने लक्षावधी वारकरी आपल्या कर्म-कुसुमांची माला पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. तो जारण, मारण, वशीकरण, काळी जादू यापैकी कुठल्याच तर्कविहिन बिनबुडाच्या मडक्यांच्या अधिन जात नाही. ज्ञानोबा व तुकोबांच्या पालखी सोहळ्यात मान्यताप्राप्त कुठल्याच दिंडीत असल्या अघोरी विद्येचे माकड चाळे केले जात नाहीत. कारण या सर्व वारकर्यांचे अधिष्ठान तुकोबाराय म्हणाले होते,
अंगी घेऊनिया वारे दया देती
तया भक्ता हाती चोट आहे ।
देव्हारा बैसवुनी हालविती सुपे
ऐंसी पापी पापें लिंपताती ।
तयाचे स्वाधिन दैवते असती
तरी का मरती त्यांची पोरें ।
पंढरीच्या वारीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकेश्वरवादाचे लोक विद्यापीठ आहे. इथे भक्त जरी लाखो असले तरी देव मात्र एक आहे. त्याच्या प्राप्तीसाठी मुखाने त्याचे नाव घ्यावे, हाताने टाळ आणि टाळी वाजवावी, मोह, माया, अंधश्रद्धेपासून दूर राहावे या चतुःसुत्रीचे आचरण करणारा प्रकाशयात्री म्हणजे वारकरी. नामस्मरणावाचून तो कुठल्याच जादू-टोण्याला महत्त्व देत नाही. वारकर्यांचे म्होरके संत-सनकादिकांनी आपल्या पाखांडा-खंडणात्मक प्रबोधनात्मक वाणीने धार्मिक अंधश्रद्धा, बुवाबाजी, पुरोहितशाही, निरर्थक कर्मकांडावर प्रहार केला. आपण त्या संतांचे पाईक आहोत. म्हणून एवढीच माफक अपेक्षा करतो की, वारीतून गावात परतल्यावर किमान वारकर्यांनी तरी गावच्या तिकटीवर परडी ठेवून लिंबू, सुया, बिब्बे दुसर्याच्या वाटेवर पसरू नयेत. एकीकडे सर्वात्मक देवाजीचे नाव आणि दुसरीकडे अघोरी विद्येला वाव असे झाले तर कुसुमाग्रजांच्या शब्दात अत्यंत खेदाने म्हणावे लागेल,
व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर
संताचे पुकार वांझ झाले ।
(क्रमशः)
* प्रा. शिवाजीराव भुकेले,
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)