कंग्राळी खुर्द : पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी गेलेला युवक विद्युत पंप सुरू करताना वीजेचा धक्का बसून ठार झाला. अमोल विवेकानंद जाधव (वय 43, रा. रामनगर-कंग्राळी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
नातेवाईकाकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोलचे बंबरगा गावाजवळ पोल्ट्रो फार्म आहे. तेथे तो कोंबड्यांना खाद्य पाणी देण्यासाठी गेला होता. दुपारी 3.30 च्या दरम्यान पाऊस सुरू होता. त्यावेळी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला जोराचा धक्का लागून तो पडला. सोबत पत्नी होती. तिने लागलीच कुटुंबातील लोकांना ही माहिती दिली. ते लगेच घटनास्थळी गेले. त्यांनी अँब्युलन्स बोलावून अमोलला सिव्हील हॉस्पीटलला नेले. मात्र डॉक्टरनी तपासणी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती हेस्कॉम व पोलीस विभागाला देण्यात आली. त्यांनी रात्री 7 च्या दरम्यान पंचनामा केला. शवविच्छेदन शनिवारी करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. अमोल मनमिळावू व शांत स्वभावाचा तरुण होता. त्याच्य पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे. डॉ. विवेकानंद (नंदू) जाधव व महात्मा फुले मंडळाच्या संचालिका विद्या जाधव यांचा तो मुलगा होय. अकाली मृत्यूमुळे कंग्राळी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची नोंद काकती पोलिसांत झाली आहे.