गोकाक : दुचाकी आणि कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मित्र जागीच ठार, तर तिसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री 11.30 वाजता घटप्रभानजीक घडली. मृत व जखमी घटप्रभा येथील आहेत.
श्रेयस उदय पत्तार (वय 19), यल्लाप्पा आनंद कोळी (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. विनायक केंपण्णा हादीमनी (वय 20) हा जखमी झाला आहे. त्याला गोकाक येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. श्रेयसचा मंगळवारी 28 रोजी वाढदिवस होता; पण त्याच्या आदल्या दिवशीच त्याला मृत्यूने गाठले.
घटप्रभा-गोकाक मार्गावरील परमेश्वरमरडीनजीक घटप्रभाकडून कार शिवापूरकडे (ता. मुडलगी) जात होती, तर दुचाकी गोकाकडून घटप्रभाकडे जात होती. वेगावर नियंत्रण मिळविता न आल्याने कार आणि दुचाकीची टक्कर झाली. या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. घटप्रभा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास करण्यात येत आहे.
वाढदिवसाआधीच मृत्यूने गाठले
अपघातातील मृत श्रेयस पत्तार हा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई शिक्षिका आहे. मंगळवार दि. 28 रोजी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. पण, त्याआधीच त्याला मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.