बेळगाव : अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत आहे, विकास निधीत पक्षपात करण्यात येत आहे, असे आरोप करत विरोधी गटातील नगरसेवकांनी महापालिकेच्या इंदूर अभ्यास दौऱ्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे 26 रोजी दौऱ्यावर जाणाऱ्या नगरसेवकांत किती जण सहभागी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महापालिकेच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांसाठी इंदूरचा अभ्यास दौरा आयोजित करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. याआधीही नगरसेवकांनी चंदिगड आणि म्हैसूर येथे अभ्यास दौरा केला होता. तेथील विकास कामांची पाहणी करून बेळगावात तशीच विकास कामे राबवली जावीत, हे यामागचे उद्दीष्ट आहे.
26 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यासाठी स्वच्छ भारत मिशनमधून 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण, नव्या माहितीनुसार तीस लाखांत हा दौरा होणार आहे. त्यासाठी ट्रॅव्हल कंपनीचीही निवड करण्यात आली आहे. पण, या दौऱ्यावर विरोधी गटातील नगरसेवकांनी बहिष्कार टाकला आहे.
गेल्या काही दिवसांत सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटातील नगरसेवकांचे बिनसले आहे. सत्ताधारी गटातून अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत आहे, त्यांची बदली करण्यात येत आहे, असा आरोप करून विरोधी गटाने आंदोलन केले होते. तर विकास निधीतही पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधी गटाने इंदूर दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.