बेळगाव : पतीकडून सातत्याने होणारा छळ सहन न झाल्याने पत्नी स्वतंत्र घर करून राहात होती. परंतु, तिथे जाऊनही पती तिला सातत्याने त्रास देत होता. पत्नी राहात असलेल्या ठिकाणी पेट्रोलची बाटली आणि काडीपेटी घेऊन गेला. तिने दार उघडत नाही म्हटल्यानंतर स्वतःला पेटवून घेण्याची धमकी देत अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. त्यात गंभीर भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. विशाल परशुराम शहापूरकर (वय 43, रा. श्रीराम गल्ली, कंग्राळी खुर्द) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (दि. 22) सकाळी सहाच्या सुमारास मारुती गल्लीतील बिर्जे कॉम्प्लेक्ससमोर ही थरारक घटना घडली.
याबाबत खडेबाजार पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विशालचे लग्न 15 वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. सततचा त्रास सहन न झाल्याने काही महिन्यांपूर्वी पत्नी त्याला सोडून स्वतंत्ररीत्या मारुती गल्लीतील बिर्जे कॉम्प्लेक्समध्ये राहते. कंग्राळीला आईसोबत राहणारा विशाल हा मारुती गल्लीत जाऊनही पत्नीला सातत्याने त्रास देत होता. याबाबत पत्नीने अनेकवेळा महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती तरीही त्याच्यात काहीही फरक पडत नव्हता.
बुधवारी सकाळी सहा वाजता विशाल हा मारुती गल्लीतील बिर्जे कॉम्प्लेक्समध्ये पत्नी राहत असलेल्या फ्लॅटसमोर गेला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार तो यावेळीही नशेत होता. सतत दार बडवत त्याने पत्नीला दरवाजा उघडण्यास सांगितले. परंतु, घाबरलेल्या पत्नीने तो पुन्हा मारहाण करणार म्हणून दरवाजा उघडला नाही. विशालने सोबत पेट्रोलची बाटली व काडेपेटी नेली होती. तो बाहेरुन आरडाओरड करत पेटवून घेण्याची धमकी देत होता. यापूर्वी देखील तो अशा धमक्या देत असल्याने पत्नीने ही बाब गांभिर्याने घेतली नाही. परंतु, विशालने पत्नीला भिती घालण्यासाठी बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून घेतले. यानंतर त्याने काडी ओढताच भडका उडाला व विशालच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्याने आरडाओरड करताच आजूबाजूचे लोक आले. काही वेळानंतर आग विझवली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताची आई रेखा परशुराम शहापूरकर (वय 62 रा श्रीराम गल्ली कंग्राळी खुर्द) यांनी खडेबाजार पोलिसात फिर्याद दिली आहे. यानुसार घटनेची नोंद झाली असून पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.