बेळगाव : कडोली (ता. बेळगाव) येथून बेळगावकडे येताना डॉल्बी कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 14) दुपारी घडली. भरत संभाजी कांबळे (22) व रोहित म्यागेरी (28) अशी जखमींची नावे आहेत.
कडोली येथील कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगाव येथे निघणार्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डॉल्बीसह येत होते. ट्रॅक्टर ट्रॉलीतून डॉल्बी आणण्यात येत होती. रस्त्याच्या बाजूला असणार्या आंब्याच्या झाडाच्या फांद्यांना डॉल्बीचा जोरदार धक्का बसला. यामुळे ट्रॉली रस्त्याच्या बाजूला कोसळली. ट्रॉलीच्या बाजूने चालत येणार्या भरत व रोहित यांच्या अंगावर डॉल्बी कोसळली. यामध्ये ते जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही डॉल्बी सिस्टम मिरवणुकीसाठी मंगसुळी (ता. कागवाड) येथून आणण्यात आली होती. काकती पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.