बंगळूर : ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. ऊस दरासंदर्भात चर्चा सुरू असून सरकारकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. ऊस दर लवकरच निश्चित होईल. यासंदर्भात साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी मंगळवारी (दि. 4) दिली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
गृहमंत्री म्हणाले, शेतकर्यांच्या समस्यांसंदर्भात मंत्री शिवानंद पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. त्यांना हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा सल्ला दिला आहे. ऊस दर नियंत्रण किंवा किंमत निश्चितीबाबत लवकरच निर्णय घ्यावा. शेतकर्यांचा निषेध असाच सुरू राहिला तर पोलिस खात्याला त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल, असे सांगितले आहे. मंत्री शिवानंद पाटील यांनी साखर कारखान्यांबाबत मंत्री सतीश जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
भाजप अशा परिस्थितीची वाट पाहात आहे. त्यामुळे त्यांनी राजकारण करणे स्वाभाविक आहे. पण ते सत्तेत असताना परिस्थिती कशी होती, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. एका महिला अधिकार्याने घरकाम करणार्या महिलेवर हल्ला केल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली आहे. मी पोलिस आयुक्तांना अचूक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर दोषी पोलिस अधिकार्यांवर कारवाई केली जाईल,असे त्यांनी सांगितले.
अधिकार्यांच्या बदल्या वर्षातील 365 दिवस होत असतात. अधिकार्यांच्या बदल्या हा मंत्रिमंडळ बदलाचा पूर्वसंकेत मानला जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याचे सांगत असल्याने या मुद्द्यावर आपण विधान करणे योग्य नाही. नवीन लोकांना संधी देण्याबाबत आपल्याकडेे कोणतीही माहिती नाही, असे गृहमत्र्यांनी सांगितले.
नेतृत्व बदल आणि मंत्रिमंडळातील फेरबदल याबाबत हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. आम्ही वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयांचे पालन करतो. त्यांचा अवमान करणार्यांवर कारवाई केल्याची उदाहरणे आहेत. भाजप पूर्वी काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीवर टीका करत होता. आता त्यांच्यातही हायकमांड संस्कृती तीव्र झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे हायकमांड निर्णयासाठी वचनबद्ध असल्याचे विधान योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री के. एन. राजण्णांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जेवण केले यात काही विशेष नाही. सुरुवातीपासूनच अशी परंपरा आहे की, मुख्यमंत्री तुमकुरला येतात तेव्हा ते राजण्णांच्या घरी जेवण करतात. आम्हीही जेवणासाठी जाऊ, असे ते म्हणाले.