बेळगाव : गवंडीकाम करणार्या दोघा मित्रांमध्ये पगार देण्या-घेण्यावरून वाद झाला. या वादातून मित्राने आपल्या गवंडी सहकार्याचा खून केला. मंजुनाथ गिरीमल्लाप्पा गौडर (वय 30, रा. गिरीयाल केबी, ता. बैलहोंगल) असे मृताचे नाव आहे. बैलहोंगल तालुक्यातील गिरीयाल येथे रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी त्याचा मित्र दयानंद मलसर्ज गुंडलूर (रा. गिरीयाल केबी) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याबाबत बैलहोंगल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत मंजुनाथ व दयानंद हे दोघे एकत्रितरीत्या गवंडीकामाला जात होते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास या दोघांमध्ये पगार देव-घेवीवरून गावातील बसथांब्याजवळ वाद झाला. दोघांचे जोराचे भांडण सुरू झाल्याने काही लोकांनी ते मिटवून दोघांना पाठवले.
दुसर्या दिवशी खून
शनिवारी रात्री दयानंद हा भांडण काढून येथून निघून गेला. परंतु, त्याच्या मनात मंजुनाथबाबतचा राग धुमसत होता. रविवारी सकाळी त्याने मुंजनाथला गावच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावरील तिगडी रोडवर बोलावून घेतले. येथे पुन्हा पगारावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. याच रागातून दयानंदने सोबत आणलेल्या विळ्याने मंजुनाथवर सपासप वार केले. यामध्ये मंजुनाथ गंभीर जखमी झाल्याने त्याला रूग्णालयात नेले. परंतु, तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृताचे वडील गिरीमल्लाप्पा नागप्पा गौडर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याची बैलहोंगल पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.