बेळगाव : आमदार राजू कागे आणि मी आमचा एक स्वतंत्र गट तयार केला आहे. आमच्यासोबत जे येतील, त्यांना घेऊन आम्ही पुढे वाटचाल करु. मला सहकार क्षेत्रात पाठवण्यात माझ्या एका जवळच्या मित्राचा मोठा हातभार होता. आता त्याचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असे मत अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 10) अर्ज भरल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, 1995 मध्ये मला डीसीसी बँकेवर पाठविण्यात कागे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आता त्यांचे कर्ज फेडण्याची वेळ आली असून आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अथणी आणि कागवाड मतदारसंघात आमदार भालचंद्र जारकिहोळी हस्तक्षेप करणार नाहीत का, या प्रश्नावर उत्तर देताना सवदी यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, सूर्य आणि चंद्राला रोज ग्रहण लागत नाही. ग्रहण लागल्यावर पूजा-अर्चा करावी लागते. सूर्य-चंद्राला ग्रहण लागल्यावर त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण पूजा-अर्चा करतो. अर्ज मागे घेईपर्यंत मी याबद्दल काहीही बोलणार नाही. त्यानंतर या विषयाबद्दल सगळ्यांना सविस्तर माहिती कळेल.
आमची जोडी डीसीसी बँकेचे संचालक म्हणून निवडून यावी अशी मतदारसंघातील जनतेची तीव्र इच्छा आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास आमदार सवदी यांनी व्यक्त केला. यावेळी कागवाडचे आमदार राजू कागे, परप्पा सवदी, सुरेश मायण्णावर, महादेव बसगौडर, चिदानंद सवदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.