कौलापूरवाडा : ग्रामस्थांशी चर्चा करताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. ईश्वर गडाद व इतर. Pudhari Photo
बेळगाव

Belgaum News | गाव सोडण्याची वेळ येऊ देऊ नका

कौलापूरवाडा ग्रामस्थ : जिल्हा आरोग्याधिकार्‍यांसमोर मांडली कैफियत

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी आरोग्य पथकासह भेट देऊन कौलापूरवाडा (ता. खानापूर) येथील हॅचरीज प्रकल्पाची पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे जगणे नको झालेले असताना नव्या हॅचरीज प्रकल्पामुळे आमच्यावर गाव सोडण्याची वेळ येणार असल्याची कैफियत ग्रामस्थांनी आरोग्याधिकार्‍यांसमोर मांडली.

येथील रि. स. क्र. 86 मध्ये क्वालिटी अ‍ॅनिमल फीड्स (प्रा.) लिमिटेड या कंपनीने हॅचरीज (कृत्रिमरित्या अंडी उबविणे) प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. 35 लाख पिल्लांची मासिक क्षमता आणि उपउत्पादनांच्या प्रक्रिया प्रकल्पाची ही योजना आहे. यासाठी प्रदूषण मंडळाकडून जल व हवा (प्रदूषण प्रतिबंधक) अधिनियमांंतर्गत परवानगीही प्राप्त केली होती. त्याचबरोबर जिल्हा आरोग्याधिकार्‍यांनी प्रकल्पाला व्यवहार्यता प्रमाणपत्र दिले होते.

या पत्राच्या जोरावर कंपनीने प्रकल्पाचे बांधकाम सुरु केले होते. याबाबत ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेतली होती. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने मंडळाने कंपनीला त्वरित बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्हा आरोग्याधिकार्‍यांनीही 6 मे रोजी प्रकल्प व्यवस्थापकांना पत्र पाठवून हॅचरी प्रकल्पाला देण्यात आलेले व्यवहार्यता प्रमाणपत्र रद्द केले आहे.

सोलार प्रकल्प अथवा हॅचरी प्रकल्पाशी संबंधित कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयातून व्यवहार्यता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याची सक्त सूचना आरोग्याधिकार्‍यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गडाद यांनी सोमवारी प्रकल्पाची पाहणी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशाविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी प्रकल्प व्यवस्थापनाने चालविल्याचे कळते. कोणत्याही परिस्थितीत कौलापूरवाडा गावाजवळ पोल्ट्री आणि तत्सम प्रकारचा कोणताही व्यवसाय सुरु करु देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्याधिकार्‍यांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT