बेळगाव : आरसीबीने पंजाब किंग्स संघाचा पराभव करत आयपीएल चषक पटकाविला. आरसीबीच्या विजयानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी किक्रेटप्रेमी मोठ्या संख्येने चन्नम्मा सर्कल येथे जमले होते. मात्र, काही अतिउत्साही क्रिकेटप्रेमींनी जल्लोषाच्या नावाखाली? ? धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगविले. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवारी रात्री आरसीबीच्या विजयानंतर बेळगावातील आरसीबीच्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरून फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष केला. चन्नम्मा सर्कल, आरपीडी सर्कल या ठिकाणी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे मध्यरात्री मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते. त्यांनी हातात वेगवेगळे ध्वज घेऊन जल्लोष साजरा करण्याचा प्रयत्न केला. तसेच काही अतिउत्साही तरुणांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत तरूणांचा जल्लोष सुरूच होता. हुल्लडबाज युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. यामुळे एकच धावपळ उडाली. यावेळी पोलिस आणि समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मात्र, पोलिसांनी कुणाचेच ऐकले नाही. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. पोलिसांनी लाठीमार सुरू करताच क्रिकेटप्रेमींची पळताभुई थोडी झाली. यामध्ये काहीजण जखमी झाले. काहीजणांनी त्याच ठिकाणी चप्पल टाकून पलायन केले .