बेळगाव : चार दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वडगाव आनंद नगर दुसरा क्रॉसवर तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात गल्लीमधून वाहणार्या पाण्यामधून पायी जाणे व मोटर सायकल चालविणे जिकीरीचे बनले होते. संपूर्ण गल्लीमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. पाण्याचा प्रवाह इतक्या मोठ्या प्रमाणात होता की पाण्यातून चालत जाणे कठीण बनले होते.
गेल्या वर्षभरापासून अर्धवट स्थितीत असलेल्या नाल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह आनंदनगर दुसरा क्रॉस परिसरातून वाहत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे तातडीने नाल्याचे काम पूर्ण करा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे दिवसभर नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. नाल्यातून तिसर्या व चौथ्या क्रॉसचे आलेले पाणी दुसरा क्रॉसवरून मोठ्या प्रमाणात वाहत आहे.