होसूर ः अपघातस्थळी पडलेली दुचाकी. Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव : अपघात भासवून भलत्याचाच खून

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

शेतीच्या वादातून एकाला मारण्याचे नियोजन केले. संबंधितासह तिघे दुचाकीवरून जाताना मागून धडक दिली. पण, सावजच दुचाकी चालवत असल्याने ते व त्यांच्या मागील व्यक्ती वाचली. परंतु, सर्वात शेवटी बसलेली व्यक्ती डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ठार झाली. यमनकमर्डी ठाण्याच्या हद्दीतील होसूर-इंगळी रस्त्यावर शुक्रवारी (दि. 20) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत तिघा संशयितांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पण या घटनेत वादाशी काहीही संबंध नसलेले विठ्ठल जोत्याप्पा रामगोनट्टी (वय 60, रा. होसूर) मृत झाले आहेत; तर खुन्यांना मारायचे होते ते दुचाकीचालक भीमाप्पा बिराप्पा डबगोळ (52, रा. होसूर, ता. हुक्केरी) व त्यांच्या मागे बसलेले बाबू कल्लाप्पा अवरगोळ (वय 60, होसूर) जखमी झाले आहेत.

अटक केलेल्या संशयितांमध्ये इनायत मीरासाब मुल्ला (वय 25, सध्या रा. अत्तार गल्ली रायबाग, मूळ रा. अरळीकट्टी, ता हुक्केरी), लाडजीसाब गजबरसाब मुल्तानी (28, मूळ रा. इंगळी, सध्या रा. लेबर कॅम्प हिडकल डॅम), सद्दामहुसेन बाशा मुल्ला (24, चिलभावी, ता. हुक्केरी) यांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, भीमाप्पा यांची होसूरमध्ये दोन एकर 35 गुंठे शेती असून ती लाडजीसाबचे वडील गजबरसाब कसत होते. परंतु, आपली शेती सोडायला सांगितल्यानंतर लाडजीसाब कब्जा करून बसला होता. याबाबत भीमाप्पा यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल करत तो 2011 मध्ये जिंकला. यानंतरही काहीतरी कुरघोड्या करत लाडजीसाबने यातील 1 एकर 12 गुंठे जागा महिलांच्या नावे येते, असे म्हणत प्रांताधिकार्‍यांकडे दावा दाखल केला. हे प्रकरणही जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात गेले. परंतु, तेथेही सुनावणी होऊन ती शेतजमीनही भीमाप्पा यांनाच देण्याचा आदेश दिला. गतवर्षी येथे लावलेला ऊसही लाडजीसाब व त्याच्या कुटुंबियांनी दादागिरी करत परस्पर तोडून नेला होता.

चार तासात संशयित ताब्यात

हा अपघात नसून खून असल्याच्या संशयातून पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी तपास सुरु केला. तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी संशयितांचा शोध सुरु केला. त्यांना अवघ्या चार तासांत म्हणजे पहाटे चारच्या सुमारास रायबागमधून अटक केली. याबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी निरीक्षक मुशापुरी व पथकाचे कौतुक केले आहे.

संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी

या प्रकरणातील संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुखांनी दिली. लाडजीसाबसह तिघे संशयित एका खुनात संशयित असून ते जामिनावर बाहेर आले आहेत. ते राऊडी शीटर असून वेळोवेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईंंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे, असे त्यांनी सांगितले.

असा रचला कट

अनेक प्रयत्न करूनही शेतजमीन मिळत नाही म्हटल्यानंतर लाडजीसाबने भीमाप्पा यांना संपविण्याचा कट रचला. भीमाप्पा शुक्रवारी रात्री होसूरमधील पंचमंडळींना आपली जमीन परत द्या हे सांगण्यासाठी गेले होते. बैठक संपवून ते गावी परतत होते. यावेळी त्यांच्या मागे बाबू व शेवटी विठ्ठल बसले होते. कटानुसार ते पुढे जात असताना होसूर-इंगळी रस्त्यावर लाडजीसाब मागून महिंद्रा एसयूव्ही कार चालवत आला. त्याच्यासोबत सद्दाम हुसेनही होता. त्यांनी दुचाकीला मागून जोराची धडक दिली. ही धडक जोरदार असल्याने दुचाकीवरील तिघेही कोसळले. सर्वात मागे बसलेले वृद्ध विठ्ठल जोराने जमिनीवर आदळले. डोक्याला दुखापत झाल्याने ते मृत पावले. यानंतरही उर्वरित दोघांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न लाडजीसाबने केला. परंतु, बाजूच्या शेतात पळून गेल्याने ते वाचले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT