सोलापूर जिल्ह्यात तीन दिवसांत ‘यलो अर्लट’ | पुढारी

सोलापूर जिल्ह्यात तीन दिवसांत ‘यलो अर्लट’

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहर व जिल्ह्यात तीन दिवसांत अर्थात 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात याच स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यासाठी ‘यलो अर्लट’ जारी करण्यात आला आहे. सोमवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली.

यावेळी आकाशात जोरजोरात विजेचा कडकडाट सुरू होता, तर ढगांचाही मोठा गडगडाट सुरू होता. मंगळवारी सायंकाळीही अर्धा तास पावसाने शहराला झोडपून काढले.

सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम ठरलेला असतो. यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 6 ते 7 दिवसांपासून शहर-जिल्ह्याच्या विविध भागांत मोठ्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे,

तर दुसरीकडे नैसर्गिक जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात आनंद निर्माण झाला असला तरी दुसरीकडे शेती पीकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.आत्ता पर्यत जिल्ह्यात पावसाची सरासरी 481.1 मिली मीटर असताना आजतागायत सोलापूर जिल्ह्यात 560.8 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात यंदा 113.0 टक्के पाऊस पडला आहे. येत्या काही दिवसातही जोरदार पावसाची शक्यता असल्याने शेतकर्‍यांना पुन्हा या संकटाचा समना करावा लागणार आहे.सोलापूर शहरात मात्र या पावसाने दाणादाण उडविली आहे.

सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला मोठा पाऊस रात्रीपर्यंत सुरु होता. मंगळवारी अर्थात 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजले नंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.

तर ग्रामीण भागात ओढे नाले पुन्हा प्रवाहीत झाले होते. येत्या काही दिवसात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.मात्र बुधवारी 6 ते शुक्रवारी 8 पर्यंत विजेच्या गडगडाट, वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवत यलो अलर्ट जाहीर केला आहे.

Back to top button