पंढरपूर, तुळजापूर मंदिराचे द्वार उघडणार | पुढारी

पंढरपूर, तुळजापूर मंदिराचे द्वार उघडणार

पंढरपूर/तुळजापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने 7 ऑक्टोबर घटस्थापनेच्या मुहुर्तावर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांसह सर्व धर्मिय धार्मिकस्थळांचे दरवाजे गुरुवारपासून खुले होणार आहेत.

त्यासाठी सर्वच तीर्थक्षेत्रांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दर्शनाच्या नियोजनासाठी मंदिर समितीच्या बैठकाही झाल्या आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरिता दररोज ऑनलाईन बुकिंग केलेल्या 5 हजार तर बुकिंग न करता आलेल्या 5 हजार अशा एकूण 10 हजार भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. तर, तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रोज 15 हजार भाविकांना सोडण्यावर निर्णय झाला आहे.

विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाऐवजी मुख दर्शन घेता येणार आहे. तुळजाभवानी मंदिरातही लांबूनच दर्शनाची सोय करण्यात आली आहे. सर्वच मंदिरांमध्ये आरोग्य तपासणी करूनच दर्शनाकरिता भाविकांना मंदिरात सोडले जाणार आहे. मंदिर समितीकडून तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

दरम्यान, मंदिरे 7 ऑक्टोबरपासून खुली केली जाणार असली तरी मंगळवारी तुळजापुरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. भवानी ज्योत नेण्यासाठीही अनेक मंडळाचे पदाधिकारी तुळजापुरात दाखल झाले होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही दर्शनाकरीता भाविकांना सोडण्यात येणार आहे. मात्र, पदस्पर्श ऐवजी मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. या संदर्भातच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत दररोज 10 हजार भाविकांना मुखदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विजयादशमी पासून सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. तर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे. तासाला 700 ते 1000 भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामधे 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे. दर्शनास येणार्‍या भाविकांची कोरोना चाचणी सक्तीची असणार नाही. मात्र दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तर मंदिरांमध्ये काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटे दरम्यान राज्यातील मंदीरे बंद होती. त्यामुळे मंदीरावर अवलंबून असलेले लोक, त्यातच नागरिकांना आपल्या देवाचे दर्शन घेता येत नव्हते. आता राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन, च्या अंतर्गत कोरोना नियमांचं पालन करुन भाविकांना दर्शन देणार देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजीराजे शिंदे, साधनाताई भोसले,शकुंतला नडगिरे, प्रकाश जवंजाळ, शिवाजीराव मोरे,ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रासह अन्य राज्यांचेही दैवत असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनापासून गेले दीड वर्ष भाविक वंचित होते. त्यात नवरात्रौत्सवात देवीचे महात्म्य मोठे असते. त्यानिमित्ताने आता नवरात्रौत्सवात सर्वाधिक भाविक येथे येतात. घटस्थापनेला तर विशेष महत्व आहे. त्यादृष्टीने भाविकांना दरवाजे खुले झाल्याने दर्शनाची सोय होणार आहे. अर्थात यामध्ये दररोज केवळ 15 हजारजणांनाच दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

अक्‍कलकोट स्वामी समर्थ मंदिराची तयारी पूर्ण

अक्‍कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरातही भाविकांची आरोग्य तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी नियोजन केले आहे. दोन दिवसांपासून मंदिराची स्वच्छता करण्याचे काम सुरू होते. मंदिरात प्रवेश करतेवेळी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवाय कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सतत जागृती करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, पुरोहिती मंदार पुजारी यांनी दिली.

यांना दर्शन मिळणार नाही

श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाकरिता 10 वर्षांखालील मुले, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना शासन आदेशानुसार दर्शनासाठी बंदी कायम ठेवली आहे. मात्र, ऑनलाईन बुकिंग करून येणार्‍या भाविकांची संख्या 5 हजारापेक्षा कमी राहिली तर त्यावेळी स्पॉट बुकिंग करून दर्शन व्यवसस्था केली जाणार आहे.

Back to top button